पुरुषसत्ताक व्यवस्थेनं स्त्रियांचं कायम शोषण केलं. आजही २१ व्या शतकात स्त्रीला पायपुसणंचं समजल्या जाते. या पुरुषसत्ताक व्यवस्थेला मुळापासून उपटण्यासाठी अनेक विचारवंतांनी काम केलं. त्यांना त्यात काही प्रमाणात यश देखील आलं. परंतू, अनेकांनी स्त्रीवादाचा चुकीचा अर्थ घेतला. त्यांच्या मते, कायम स्त्रीयांची बाजू घेणं, त्यांच्या हक्कांविषयी बोलणं म्हणजे, स्त्रीवाद. दुसरं असं, काहींनी स्त्रीवादाचा अर्थ पुरुषविरोधी असा घेतला. खरंतर एवढा संकुचित अर्थ स्त्रीवादाचा नसून तो प्रचंड व्यापक आहे. स्त्रीवाद केवळ महिलांच्या प्रश्नांविषयी, त्यांच्या हक्कांविषयी बोलत नाही तर, सर्व लिंगांच्या हक्कांविषयी बोलतो. स्त्री ही पुरुषाप्रमाणे माणूस असूनही तिचे नैसर्गिक अधिकार पुरुषसत्ताक व्यवस्था नाकारते, हे समजणे म्हणजे स्त्रीवादी जाणीव होणे.
महिलांना समानतेची वागणूक मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी त्यांना हीन दर्जा दिला जातो. त्यामुळे महिला एकत्र येऊन आंदोलन करतात. खरंतर त्या त्यांच्या हक्कांसाठी लढत असतात. लढलंच पाहिजे. अनेकांना वाटतं, स्त्रीयांचा केवळ पुरुषांना विरोध असतो. मात्र, त्यांचा पुरुषांना विरोध नसतोच. त्यांचा विरोध असतो तो, त्यांना मिळत असलेल्या हीन आणि दुय्यम वागणूकीला. त्यांच्या या लढ्यात अनेक पुरूष देखील त्यांच्या सोबत असतात. पुरूष विरोधी असा जर स्त्रीवादाचा अर्थ असता तर पुरुष त्यांच्या लढ्यात सहभागी झालेच नसते. मी देखील स्त्रीयांच्या लढ्यात कायम त्यांच्या सोबत आहे. कारण, त्यांचा हा लढा त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि असमानतेच्या विरोधात आहे. स्त्री-पुरुष विषमता, सर्व प्रकारच्या शोषण, विषमतेला नकार देणे हे स्त्रीवादाचे मध्यवर्ती सूत्र आहे. स्त्रीवाद हा केवळ स्त्रियांवरील अन्याय आणि मुक्तीविषयी बोलत नाही, तर जेथे शोषण, अन्याय होतो, त्याविरोधात तो आवाज उठवतो.
दुसरं म्हणजे, स्त्रीवादी चळवळ हा फक्त स्त्रियांचा प्रश्न नसून, पुरुषांची मानसिकता बदलण्याचा तो प्रयत्न आहे. स्त्री-पुरुष समानतेसंदर्भात अनेकदा लोक म्हणतात, “मी स्त्रीवादी नाही बरं का! पण मी समानता मानते/ मानतो”. मुळात स्त्रीवाद हा समानतेच्याच तत्त्वावर उभा आहे हे सर्वांत आधी आपण समजून घेतले पाहिजे. दोन वर्ग, दोन देश, दोन जाती, दोन धर्म या लढायांप्रमाणे स्त्री-पुरुष ही लढाई नाही. कारण सत्तेचे हस्तांतर हा स्त्रीवादात मुद्दाच नाही. तर परस्परांचा सन्मान राखून व समतेच्या पायावर नवी समाजरचना जन्माला घालणं हा स्त्रीवादाचा हेतू आहे. दुसरा मुद्दा असा- आजही आपल्या समाजात पितृसत्ताक पद्धती रुजलेली दिसते, त्यामुळे स्त्रियांच्या शोषणास सर्रास अधिमान्यता मिळते. पितृसत्ताक पद्धतीला आव्हान दिल्याशिवाय आता तरणोपाय नाही. पुरुषसत्ताक सत्तासंरचना नष्ट व्हावी, कारण ती माणसामाणसांमधील समतेला नाकारते. मात्र, पुरुषसत्ताक व्यवस्था नष्ट रून स्त्रीसत्ताक व्यवस्था निर्माण व्हावी, असं वाटत नाही. तर, पुरूषप्रधान किंवा स्त्रीप्रधान समाज निर्माण झाल्यापेक्षा माणूसप्रधान समाज निर्माण व्हावा, हे मात्र अगदी तळमळीन वाटतं. या वैचारिक भूमिकेतूनच ‘वुमेन’ या पत्रिकेची निर्मिती झाली आहे.
‘वुमेन’ ही पत्रिका केवळ स्त्रियांचे प्रश्न मांडत नाही, तर पितृसत्ताक, जातीय आणि वर्गीय सत्तारचना ढवळून काढते तसेच समता व स्वातंत्र्याच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा आग्रह धरते. स्त्रीवादी विचार ही केवळ स्त्रियांसाठीची चळवळ नसून, समतावादी, न्यायाधिष्ठित आणि लोकशाही समाजनिर्मितीची प्रक्रिया आहे, अशी आमची ठाम भूमिका आहे. या भूमिकेशी एकनिष्ठ राहून पितृसत्ताक, जातीय, वर्गीय, धार्मिक, लैंगिक व सांस्कृतिक सत्तासंरचनांना प्रश्न विचारणे व त्यांना आव्हान देणे ही ‘वुमेन’ची नैतिक जबाबदारी आहे. ही पत्रिका इंटरसेक्शनल फेमिनिझम स्वीकारते. महिलांचे अनुभव एकसारखे नसतात, हे मान्य करून जात, वर्ग, धर्म, प्रदेश, लैंगिकता या सगळ्या घटकांमुळे प्रत्येक स्त्रीचे अनुभवविश्व वेगळं घडतं. वेगळं असतं. त्यामुळेच मुख्य प्रवाहातून सातत्याने वगळल्या गेलेल्या दलित, आदिवासी, कामगार, शेतकरी, अल्पसंख्याक समुदायांतील महिला, स्थलांतरित महिला, LGBTQIA+ समुदायातील व्यक्तींच्या आवाजाला या पत्रिकेत विशेष प्राधान्याने स्थान देऊ.
पितृसत्ता ही केवळ घरगुती संबंधांपुरती मर्यादित नसून ती शिक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था, कामाचे ठिकाण, धर्म, परंपरा, कायदे, न्यायव्यवस्था, माध्यमे या सर्वच ठिकाणी खोलवर रुजलेली आहे. ‘वुमेन’ पितृसत्तेच्या दृश्य आणि अदृश्य, सौम्य आणि हिंसक, परंपरागत आणि आधुनिक अशा सर्व स्वरूपांचा शोध घेते. तसेच ही पत्रिका स्त्रीवादाला अर्थव्यवस्थेपासून वेगळे मानत नाही. घरगुती श्रमांचे अवमूल्यन, असंघटित क्षेत्रातील महिलांचे शोषण, वेतनातील दरी, स्थलांतर— या सगळ्या प्रश्नांकडे वर्गीय व स्त्रीवादी दृष्टिकोनातून ‘वुमेन’ पाहते. धर्म व परंपरा या स्त्रियांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करतात. ही पत्रिका धर्माच्या नावाखाली होणाऱ्या स्त्रीदमनाला, नैतिकतेच्या बडेजावाला आणि संस्कृती रक्षणाच्या नावाखाली लादल्या जाणाऱ्या बंधनांना आव्हान देते. स्त्रीवाद हा सतत विकसित होणारा विचार आहे. मतभेद, प्रश्न, अंतर्गत टीका आणि आत्मपरीक्षण यांशिवाय कोणतीही चळवळ जिवंत राहू शकत नाही, असे आम्ही मानतो. म्हणूनच तर्कसंगत आणि आदरयुक्त चर्चेला, संवादाला प्रोत्साहन देईल. महत्वाचा मुद्दा- ‘वुमेन’ ही पत्रिका निरपेक्ष असल्याचा आव आणत नाही. ती सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी स्वीकारते आणि अन्यायाविरुद्ध स्पष्ट भूमिका घेते.
- संपादक