Period Delaying Pills : मासिक पाळी (Menstrual cycle) आणि देवधर्म हा कायम वादाचा मुद्दा राहिलेला आहे. अनेक ठिकाणी आजही मासिक पाळीकडे (Periods) संकुचित नजरेने पाहिले जाते. पाळी हा विटाळ आहे, त्या चार दिवसांत महिलेनं देवपुजा करू नये, अशा अनेक गैरसमजूती आहेत. त्यामुळं सणावाराला, धार्मिक कार्यात अडचण नको म्हणून मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी महिला सर्रास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या खातात. तुम्ही देखील डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर गोळ्या खात आहात का? तसे असेल तर हे गंभीर आहे. अशा गोळ्या खाल्ल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो. त्यामुळं कोणत्याही गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
खरंतर मासिक पाळी ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. महिन्यातून एकदा ती प्रक्रिया महिलांच्या शरीरात होत असते; पण याला धार्मिक बाबींशी जोडल्याने किंवा मासिक पाळीत होणार त्रास नको म्हणून अनेकदा महिलांना मासिक पाळी उशिरा यावी असे वाटते. त्यामुळे लग्नसमारंभ, सण-उत्सवात बऱ्याच महिला व किशोरवयीन मुली पाळीची तारीख मागे - पुढे ढकलण्यासाठी गोळ्यांचा वापर करतात. आता तर मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या मेडिकल स्टोअरमध्ये अगदी सहज मिळतात. त्यामुळे स्त्रिया त्यांना वाटेल तेव्हा त्या गोळ्या घेतात. सुरुवातीला हा एक चांगला पर्याय म्हणून समजला जातो. परंतु काही काळानंतर याचा आपल्या हार्मोन्सवर परिणाम होतो.
ह्या गोळ्या संप्रेरकांची पातळी मागेपुढे करण्याचे वा बदलण्याचे काम करतात. त्यामुळे त्याच्या परिणामाइतकेच दुष्परिणाम स्त्रियांच्या शरीरावर होतात. केवळ मासिक पाळी पुढे ढकलणे इतकेच या औषधांचे काम नाही तर स्त्रीबीज बाहेर पडत नसतील तर त्यावेळीही हे औषध म्हणून दिले जाते. अतिरिक्त रक्तस्त्राव थांबवणे, मासिक पाळी नियमित करणे अशा अनेक कारणांसाठी या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या जातात. मात्र, या गोळ्या स्वतःहून घेण्याची बाब नाही. डॉक्टर देखील या गोळ्या घेण्याचा सल्ला देतात तेव्हा काही ठराविक काळासाठी हे औषध दिले जाते, त्याचा दीर्घकालीन डोस दिला जात नाही. कारण, या गोळ्यांचा परिणाम एवढा घातक असतो की, त्याचा परिणाम मासिक पाळीच्या चक्रावर होतो.
मासिक पाळी लांबवण्याच्या गोळ्या खाल्ल्यामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या होणे, ब्रेन स्ट्रोकचा धोका, प्रजननासंबधी अडचणी, अशा गंभीर स्वरूपाच्या दुष्पपरिणामांना सामोरे जावे लागू शकते, पाळी लांबवण्यासाठी बायका दहा ते पंधरा दिवस या गोळ्या घेत राहतात. त्याचा डोस जास्त झाल्याने याचे परिणाम फार घातक असतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मासिक पाळी पुढे ढकलणारी औषधे कितपत सुरक्षित?
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रेया पाटील म्हणाल्या, मासिक पाळी पुढे ढकलणारी ही औषधे पूर्णपणे सुरक्षित असू शकत नाही. मात्र, अनेक महिला आपल्या सोयीप्रमाणे पाळीची तारीख मागे-पुढे करण्यासाठी गोळ्यांचा वापर करतात. त्यांना एक चांगला पर्याय वाटत असला, तरी यांचा वाईट परिणाम स्त्रियांच्या नैसर्गिक हार्मोन्सवर होत असतो. त्यामुळे ह्या गोळ्या घेण्यापूर्वी तज्ञांशी अथवा तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणे अत्यावश्यक आहे. मात्र ज्यांना तातडीने प्रवास करायचा आहे किंवा पाळी पुढे ढकलून एखादे लग्न अथवा समारंभ यांचा पूर्णपणे आनंद घ्यायचा आहे, तेव्हा या गोळ्या खरोखर उपयुक्त ठरतात.
तज्ज्ञांच्या मते, या गोळ्यांचा सतत वापर केल्यास भविष्यात मासिक पाळी थांबू शकते किंवा प्रजननासंबंधीत समस्या उद्भवू शकतात. मुळात मासिक पाळी हे एक नैसर्गिक चक्र आहे. १५ दिवसांनी बीज तयार होणं १५ दिवसांनी पाळी येणं हा निसर्गाचा रिदम आहे. आपण ही गोळी घेणं म्हणजे हा रिदम बदलणं आहे. त्यानेच आपल्या शरीराचं नुकसान होतं. मासिक पाळीच्या चक्राचा स्वीकार करावा. या चक्राला कोणत्याही प्रकारे गोळ्या किंवा तत्सम पदार्थ घेऊन छेडछाड करू नये.
काय परिणाम होतो?
१. गोळ्यांचा दीर्घकाळ वापर केल्यास 'मासिक पाळी अनियमित होऊ शकते.
२. प्रजननासंबंधित अडचणी उद्भवू शकतात.
३. मासिक पाळीत बदल केल्याने हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम होतो.
४. मासिक पाळी लांबवल्याने त्या कालावधीपुरता आराम मिळतो.
५. यकृताला इजा होण्याची शक्यता.
६. पायापासून मेंदूपर्यंत शरीराच्या कोणत्याही भागामध्ये गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता.
थोडक्यात, या गोळ्यांचे सेवन अधूनमधून घेतल्यास त्याचा फारसा त्रास होत नाही. वारंवार घेतल्यास शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे गरजेचे आहे.
