सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेलं नाव म्हणजे ‘प्राजक्ता चव्हाण’. प्राजक्ताने यापूर्वी ‘तुझं माझं सपान’ या मालिकेतून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कुठल्याही अॅक्टिंग स्कूलमध्ये न जाता, केवळ चित्रपट बघत-बघत अभिनय करणारी आणि मिळालेल्या संधीच सोन करत स्वतःची कारकीर्द घडवायला सुरुवात करणाऱ्या या गुणी आणि प्रतिभासंपन्न अभिनेत्रीशी वुमेनच्या टीमने साधलेला हा सुसंवाद …
लहानपणाच्या प्राजक्ता कशा होत्या?
- मी एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून येते. माझं बालपण साताऱ्यातील तळिये या मूळ गावी गेलं. इतर शेतकरी कुटुंबातील चारचौघी जशा जगतात, तसेच मी जगले. वाढले. शेतात कामं केली. जनावराचं दूध काढलं. घरी-दारी, शेतात मुलांच्या वाट्याला येणारी जे काही कामं असतात, ती कामंही केली. हे सगळं करत असताना स्पोर्ट्सची आवडही जोपासली. तुम्हाला सांगायला आवडेल, मला लहानपणापासूनच स्पोर्ट्सची खूप आवड होती. आजही आहेच... तर, शाळेत असताना खेळात मी भाग घ्यायचे. कबड्डी खेळायचे... लहानपणी वाटायंच की, आपण भरती द्यावी, आर्मीत जाऊन देशसेवा करावी. आर्मीच जायची माझी खूप इच्छा होती. तेच माझं स्वप्न होतं.
तुमचं शिक्षण काय झालं?
- माझं अॅनिमल हसबंडरीचं शिक्षण झालं. तशा मी शाळा खुप बदलल्या. म्हणजे, मी लहानपणी इंग्रजी माध्यमात शिकले. पाचवीपर्यंत इंग्रजी माध्यमात होते. मात्र, इंग्रजी माध्यमात शिकतांना मला मराठी कळायला अडचण येत असे. तेव्हा धड मराठीही चांगलं येत नव्हतं आणि धड इंग्रजीही येत नसे. नंतर माझ्या घरच्यांनी मला सेमी इंग्लिशमध्ये टाकलं. त्यामुळे माझं दहावीपर्यंचं शिक्षण हे सेमी इंग्लिशमध्ये झालं. पुढं बारामतीला शारदाबाई पवार महिला महाविद्यायलात सायन्सला प्रवेश घेतला. तिथून मी कुस्ती खेळायला सुरूवात केली. बारामती मोठं शहर आहे, शिक्षणाच्या सुविधा उत्तम आहे. अनेकजण बारातमीला दूरवरून शिक्षणासाठी येतात. मात्र, बारामतीला मी केवळ शिक्षणासाठी गेले नव्हते, तर तिथलं ग्राऊंड, एनसीसी, स्पोर्ट्स क्लब हे पाहून मी बारामतीचा पर्याय निवडला होता. तिथं गेल्यानंतर मी स्पोर्ट्स करत असे. कबड्डी खेळत असे.... मात्र, माझे कबड्डी खेळणाऱ्या आमच्यासंघासोबत काही खटके उडाले आणि मी सांघिक खेळ न खेळण्याचं ठरवता कुस्ती हा खेळ निवडला. मला कबड्डी नाही तर कुस्ती खेळायची आहे, याबाबत मी तिथल्या आमच्या सरांशी बोलले. सरांनी कुस्ती खेळायला परवानगी दिली. मात्र, त्यांनी एक महिना मला मॅटवरच उतरून दिलं नाही. कारण, माझ्यात ताकद होती, पण मला कुस्तीचे डावपेच माहित नव्हते. कुस्ता हा खेळ माझ्यासाठी नवखा होता. सुरूवातीला मी फक्त इतरांच्या कुस्त्या बघत असे आणि मग मी हॉस्टेलवर जाऊन गाद्यांवर कुस्ती खेळणाऱ्या मैत्रीणींसोबत प्रॅक्टीस करायचे. नंतर मीही मॅटवर कुस्ती खेळायला लागले. मी २०१७ पैलवानकीला सुरूवात केली. २०१८ ला मी स्टेट लेव्हला खेळले आणि २०१९ नॅशनलपर्यंत पोहोचले होते.
तुम्ही म्हणालात, मी कबड्डी खेळायचे, कुस्ती खेळायचे. मुळात हे दोन्ही पुरुषी खेळ आहेत, अशी एक समजूत आपल्या समाजात आहेत. तर या खेळांसाठी घरातून विरोध नाही झाला कधी?
- नाही, कुस्तीला कधी विरोध झाला नाही. मुळात घरच्यांनी कधीच कशालाच विरोध केला नाही. मी ग्रामीण भागात वाढले, ग्रामीण भागात मुलींना बऱ्याचदा चौकटीत जगावं लागते. बरीच बंधनं मुलींवर असतात. पण, मी कायमच चौकट मोडत आले. तुम्हाला सांगते, मी जेव्हा पहिल्यांदा बॉयकट केला, तेव्हा आईने मला खूप झापलं होत. खूपच ओरडली होती आई. माझी आई जरा तापट स्वभावाची आहे आणि ती गावखेड्यातली असल्यामुळे नवीन बदल स्वीकारायला तिला वेळ लागतो... माझे बाबा बदल लवकर स्वीकारतात. मी बॉयकट केल्यानंतर त्यांनी लाडाने कौतुकचं केलं होतं माझं. पुढं मी श्रीगोंद्याला आणि पुण्याला जेव्हा कुस्ती शिकण्यासाठी आखाड्यात गेले तेव्हा आमच्या वस्तादांनी मला चक्क टक्कल करायला सांगितलं होतं. मीही कुठलाच विचार न करता केस उडवले. हे आईला कळलं तेव्हाही ती चांगलीच चिडली होती. तुला काही लाज वैगरे आहे का? असं बरंच काही बोलली होती. घरच्यांनी कधी कुठला विरोध केला नाही, फक्त आईने तेवढ्यापुरताच विरोध केला. मुलीनं मुलीसाखं राहवं, एवढचं तिचं म्हणणं असे. पण, कुस्तीसाठी टक्कल केल्याने बाहेरच्या लोकांनी बरेच टोमने मारले. नावं ठेवली होती. पण, त्याच टक्कलमध्ये मेडल घालून माझे अभिनंदनाचे बॅनर्स लागले, तेव्हा त्याचं लोकांनी माझं तोंडभरून कौतुक देखील केलं.
कॉलेजमध्ये असतांना अभ्यासाव्यतिरक्त आणि खेळाव्यक्तिरिक्त कोणत्या गोष्टीत रुची होती?
- मी कबड्डी सोडून कुस्ती खेळण्याचं ठरल्याने मला सरांनी एक महिना मॅटवरच उतरू दिलं नाही. शिवाय, आता जे करायचं ते कुस्तीतच करायचं असं मनाशी ठरवल्याने मी कुस्ती या खेळाविषयी बरीच माहिती मिळवत राहिले. हा खेळ माझ्यासाठी नवीन होता. त्यामुळे आमच्या कॉलेजच्या इंटरनेट लॅबला तासनतास बसून बबिता फोगट, विनेश फोगट अशा नावाजलेल्या महिला कुस्तीपटूंचे व्हिडिओ पाहायचे. त्यांचे डावपेच, टेक्निक पाहायचे... शिवाय, मी एनसीसी देखील करायचे.
अभिनयाचे खुळं कधीपासून लागलं? आपण कधी अभिनेत्री होऊ असं वाटलं होतं का?
- अजिबातच नाही, माझी कहानीच वेगळी आहे. मला स्वप्नातही आपण अभिनेत्री होऊ असं वाटलं नाही. कारण, या क्षेत्रातलं माझं फॅमिली बॅकग्राऊंड नव्हतं. शिवाय, मला मुलींसारखे चालता येत नाही, बोलता येत नाही, आणि गावात नाटक, एकाकिंकेचं काहीचं वातारवणही नव्हतं. त्यामुळं कधी अभिनय-नाटक याच्याशी संबंध आला नाही. त्यामुळं साहजिकच अभिनेत्री होण्याचं स्वप्नही कधी उराशी बाळगलं नाही.
'तुझं माझं सपान' ही मालिका तुम्हाला कशी मिळाली ?
- या मालिकेच्या ऑडिशनबद्दल मला माझ्या एका मैत्रीणीकडून कळालं होतं. तू एकदा ऑडिशन दे, असं तिनेच सूचवलं. सूचवलं म्हटल्यापेक्षा तिचा मी ऑडिशन द्यावी, असा तिने आग्रहच धऱला होता. त्यामुळे त्या मालिकेशी संबंधित सरांना फोन केला. मी पैलवान आहे, तुमच्या ऑडिशनविषयी कळलं. मला काम करायला आवडेल, पण मला अभिनय अजिबातच येत नाही, असं सांगितलं. त्यांनी माझ्या अॅक्टिंग करतानाचे माझे काही व्हिडिओ मागवून घेतले. मी माझे काही व्हिडिओ त्यांना पाठवले. मला ऑडिशनचा व्हिडिओ कसा शुट करायचा असतो? व्हिडिओ कसा असला पाहिजे? हे देखील माहिती नव्हतं. मी सरांना जो व्हिडिओ पाठवला, त्यात ना मी नमस्कार केला होता, ना स्वत:ची ओळख करून दिली होती... मी तसाच व्हिडिओ पाठवून दिला. दुसऱ्या दिवशी मला सचिन गोस्वामी सरांचा फोन आला, ते मालिकेचे निर्माते होते. माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी तू डेलीसोप करशील का? असं मला विचारलं. मी जरा चक्राऊनच गेले. मी तर मालिकेसाठी ऑडिशन देतेय आणि हे मला साबनाच्या जाहिरातीविषयी का विचारत आहेत. मी तसं त्यांना विचारलं, सर साबनाची जाहिरात करायची का? तर डेलीसोप म्हणजे साबनाची जाहिरात नाहीये, मालिका करशील का? डेलीसोपलाच मालिका म्हणतात, हेही मला त्यांनीच सांगितलं. मी होकार दिल्यानंतर चार दोन दिवसांनी त्यांनी मला एक स्क्रिप्ट पाठवली आणि अभियनयाचा व्हिडिओ करून मागितला. निवड झाली की कुस्ती तुम्हाला खेळता येणार नाही, असंही बजावलं. मी स्क्रिप्ट वाचली. माझ्या माझ्या पद्धतीने अॅक्टिंग केली अन् व्हिडिओ पाठवून दिला. त्यानंतर काही दिवसांनी सचिन सरांनी मला मुंबईला बोलावून घेतलं. माझ्या मामांना सोबत घेऊन मी मुंबईला गेले.
मुंबईला गेल्यावर तिथ सरांनी माझ्या हातात पु्न्हा एक स्क्रिप्ट देऊन अभिनय करून दाखवालया सांगितला. कौस्तुभ दिवान सरांनी मला सीन समजाऊन सांगिलला. मीही चार-दोनदा स्क्रिप्ट वाचली आणि अभियन करून दाखवला. पण, मला उत्तम प्रकारे अभिनय करता आला नाही. मी उत्तम अभिनय करण्याचा प्रयत्न केला. पण मला जमलंच नाही. मग गोस्वामी सरांनी तू स्क्रिप्टवर लक्ष देऊ नको, एकदा-दोनदा स्क्रिप्ट वाच आणि तू जसं बोलतसेच तसे नॅचरली संवाद म्हण. अॅक्टिंग करूच नको, नॅचरल अभियन कर... सरांनी सांगितलं, तसं मी परफॉर्म केलं आणि शेवटी, 'तुझं माझं सपान' या मालिकेसाठी माझं सिलेक्शन झालं... आमची मालिका ही पैलवान मुलीच्या आयुष्यावर बेतलेली होती. त्यामुळए अभिनय येते अशा एखाद्या मुलीली निवड करून त्या मुलीला पैलवान करायचं, त्यापेक्षा पैलवान मुलीला घेऊन तिला अभिनय शिकवू, हा विचार गोस्वामी सरांचा होता... मला अभिनयाची समज नव्हती, कधी अभिनय केला नव्हता. त्यामुळं गोस्वामी सरांनी माझे वर्कशॉप घेतले. वर्कशॉप झाल्यानंतर एप्रिल २०२३ महिन्यात आमचा प्रोमा आला आणि १९ जूनला मालिका टेलिकास्ट झाली.
कुस्ती सोडून अभिनय करणार, असं ठरवलं तेव्हा घरच्या लोकांच्या काय रिअॅक्शन होत्या? त्यांचा पाठिंबा होता का?
- हो, घरच्यांचा सपोर्ट होताच. फक्त टाईमपास करू नको. शंभर टक्के देण्याचा प्रयत्न कर, तेवढचं त्यांनी सांगितलं. माझे आणि बाबा खूप सपोर्टिव्ह आहे. हे कर किंवा ते करू नको अशी बंधने त्यांनी माझ्यावर कधी लादली नाहीत.
कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा उभं राहतांना भीती वाटली असेल...
- नाही, कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा उभी राहिली, तेव्हा भीती वाटली नाही, कुठलं दडपण घेतलं नाही. मुळात मी पैलवान असल्यामुळे हजारोच्या संख्येने असलेल्या पल्बिक समोर कुस्ती खेळलेली आहे. शिवाय, कुस्तीत विजयी झाल्यानंतर भाषणंही ठोकलेली आहेत. त्यामुळे डेअरिंग भरपूर आहे. शिवाय, आमच्या सीरियलाच पहिला सीन आम्ही कुस्तीचा शुट केला होता आणि कुस्ती हा माझ्या सरावाचा भाग आहे... त्यामुळे तो सीन नॅचरली केला. दडपण नव्हतं कशाच. कॅमेऱ्याचीही भीती वाटली नाही.
बऱ्याचदा मुली स्वत:च्या दिसण्याविषयी किंवा शरीराविषयी न्यूनगंड बाळगतात. अभिनेत्री व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या मुलींना काय सांगाल?
- चार दिवस लोक तुमच्या दिसण्याकडे बघतात. त्यानंतर तुम्ही काय काम करता? कसं काम करता? त्याच्यावर लोक प्रेम करत असतात. लोक माझ्या दिसण्यावर प्रेम नाही नाही केलं. मी कुस्ती खेळतं होते, खेळात माझं बेस्ट देत होते, त्यामुळे लोकांमध्ये नावं झालं. लोकांनी कौतूक केलं. आता अभिनय करतेय, लोकांना काम आवडतं. मी जशी आहे, तसं मला प्रेक्षक स्वीकारत आहे. दुसरं म्हणजे, माझं वजनं ८० किलो आहे. मी दिसायला जाड आहे. पण, मला माझ्या जाडेपणामुळे नाही संघर्ष करावा लागला. प्रेक्षकांनी नसतं स्वीकारलं तरी मी स्वत:ला युनिकच समजले असते. मी आजही स्वत:ला युनिक समजते. कारण, मी पैलवान आहे, कुस्त्या खेळते अन् अभिनय देखील करते. मुळात आपण प्रत्येकजण युनिकच असतो. त्यामुळं स्वत:ला युनिक समजा. जे तुमच्यात असतं आणि इतरांमध्ये नसतं, त्याला दोष म्हणू नका. त्याच्याकडे न्यूनगंड म्हणून न पाहता, वेगळेपण म्हणून पाहायला शिका. आपल्याला कामामुळे आदर भेटत असतो. दिसायला सुंदर नसलं तरी काम उत्तम असलं पाहिजे. चांगलं दिसणं वाईट नाहीच आहे, पण सगळं दिसण्यावरही घालून नका. कामावर फोकस करा. कारण, अभिनय क्षेत्रात काम करताना तुमचं दिसणं जेवढं महत्वाचं असेल त्याहून कितीतरी अधिक महत्त्वाची असतं तुमचं टॅलेंट. त्यामुळे मी जाडच आहे, माझा रंगच गोरा नाही, मी दिसायलाच सुंदर नाही असल्या गोष्टींचा न्यूनगंड कधी बाळगू नका. त्यापेक्षा स्वत:ला आहे तसं स्वीकारा, स्वत:वर प्रेम करा आणि स्वत:ला सिद्ध करा. मग दुनिया तुम्हाला आहे तसं स्वीकारेल... भारती सिंग दिसायला जाड आहेत, पण कित्ती उत्तम काम करतात त्या आणि सगळ्यांना त्यांच्या कामामुळे त्यांच्याविषयी आदरही आहे.
तुम्ही अभिनयाचे प्रशिक्षण कोठे घेतलं?
- नाही, माझं अभिनयाचं कुठलंही खास प्रशिक्षण झालं नाही. मला मालिका मिळाल्यानंतरच मी अभिनयाकडे गांभीर्याने पाहू लागले. अभिनयाची समज वाढवण्यासाठी मी खूप चित्रपट पाहिलेत. चित्रपटामध्ये इतरांचं काम बघितल्यानंतर त्यातून आपल्याला काय करायचं आणि काय नाही, अभिनय कसा केला पाहिजे, हे मला कळतं गेलंय आजही भरपूर सिनेमा पाहते, वेबसीरिज पाहते, त्यातून शिकतेय.
तुम्ही छोट्या पडद्यावर प्रेमात पडला होता. वास्तविक जीवनात कधी प्रेमात पडला?
- नाही, मी सध्या तर स्वत:वरच प्रेम करते. मी स्वत:च्याच प्रेमात आहे. मी स्वत: काही चांगलं केलं तर मी स्वत:लाच गिफ्ट देते. स्वत:चं कौतूक करते. इतरांच्या प्रेमात मी अजून पडले नाही. आमच्या पैलवानकीच्या क्षेत्रात चांगले - राजबिंडे पैलवान आहे. मित्र म्हणून अनेक जण आवडतात. कुणाचीही त्यांच्यावर नजर जाईल असेच आहेत ते. मित्र म्हणून ठीक आहेत, पण त्यांच्याबद्दल कधी प्रेम नाही वाटलं.
उत्तम अभिनेत्री होण्यासाठी काय आवश्यक आहे?
- अभिनेत्री असण्यासाठी रंगरुप गरजेचं नाही. तर, त्यासाठी अंगी कला आणि जिद्द असणं गरजेचं आहे.
तुमच्यावर कोणत्या अभिनेत्रीचा प्रभाव आहे?
- मला कंगना राणावत आवडतात. त्याचा संघर्ष मला प्रेरणा देऊन जातो. कंगणाचा मनकर्णिका सिनेमा मला खूपच आवडून गेला.
आपल्याकडे बायोपिक सिनेमे सोडले तर फारसे नायिकाप्रधान चित्रपट बनत नाहीत, अभिनेत्री म्हणून याकडे कसे बघता?
- एक काळ असा होता की, हिरो, हिरॉईन, आणि व्हिलन या त्रिकोणाशिवाय चित्रपट पूर्णच होत नसे. आता चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग होत आहेत. आज भारतीय चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचला आहे. गेल्या काही वर्षांत उत्तम नायिकाप्रधान सिनेमे आले आहेत. ज्यात ‘मेरी कॉम’, ‘नीरजा’या चित्रपटांचा समावेश होता. याशिवाय, ‘पिंक’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘पार्च्ड’, ‘मॉम’, ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमांमध्येही नायिका ही मध्यवर्ती होती. नायिकाप्रधान चित्रपट बनतचं नाहीत, अशातला भाग नाही, बनतात. मात्र, त्या चित्रपटांचा टक्का फारच कमी आहे. प्रेक्षकांची समज उंचावत असून नायिकाप्रधान सिनेमा प्रेक्षकांनाही आवडू लागले असल्याने आता व्यावसायिक चित्रपटांची चौकट सांभाळून वेगळे विषय देणारे, वेगळ्या धाटणीचे आणि नायिकाप्रधान चित्रपट सातत्याने येणं गरजेच आहे.
अभिनयाच्या कामाचे महिला कलाकारंना पुरूष कलाकारांच्या मानधनापेक्षा कमी पैसे मिळतात, असं बोलल्या जातं. यात तथ्य आहे का?
- अनेक ठिकाणी, अनेक क्षेत्रात महिलांना पुरुषांना जेवढं वेतन मिळंत, तेवढं दिलं जातं नाही. हा मुद्दा महत्वाचाच आहे. मी अभिनय क्षेत्रात नवीनच आहे. त्यामुळं आमच्या क्षेत्रातही असं काही होत असेल तर मला कल्पना नाही. मला तरी अद्याप असा अनुभव आलेला नाही.
अभिनेत्री नसल्या असत्या तर कोण झाला असता?
- खूप पर्याय समोर होते. आर्मीत जायचं स्वप्न होतं. मला दहावीला ८० टक्के मार्क होते, बारावीला ६५ टक्के मार्क होते. मात्र, ८५ चा कट ऑफ होता. त्यामुळं आर्मीत जाऊ शकले नाही. मग मालिका भेटली. मालिका भेटली, अभिनेत्री झाले नसते तर फायर ब्रिगेड, पोलीस, कशात तरी गेलेच असते.
तुमची पसंती कशाला असेल सिनेमा, नाटक की सिरिअल?
- मी मालिकेत लीड रोल केलाय. त्यामुळे मला दुसऱ्या प्रोजेक्टमध्येही लीडच भेटावा, असा माझा आग्रह नाही. जी भूमिका वाटल्याला येईल, त्याच जीव ओतून काम करेल.... आणि खरंतर ही माझी सुरवातच आहे. त्यामुळं केवळ नाटक किंवा सिनेमा असं काही मी ठरवून घेतलं नाही. मला फक्त काम करायचं. मला सिनेमा, नाटक, सिरियल, वेबसिरीज सगळ्याच माध्यमातं काम करायला आवडेल.
आगामी प्रोजेक्ट्स बद्दल काय सांगाल?
- सध्या फक्त हास्यजत्रा करतेय. एक-दोन चित्रपटांसाठी ऑडिशन्सन दिल्यात. बघू काय होतंय...
निवांतक्षणी तुमच्या आवडी निवडी कशी जोपासता?
- मी व्यायालामला खूप प्राधान्य देते. आता मी कुस्ती वा कबड्डी खेळत नाही, त्यामुळे स्वत:ला फीट ठेवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून न चुकता व्यायाम करते. जीमला जाते. कारण, कोणतंही काम करायचं म्हटलं की, तुम्ही शरीराने आणि मनाने फिट असणं गरजेचं आहे. याशिवाय, चित्रपट पाहते, पुस्तके वाचतेय. मी ग्रामीण भागातून असल्यामुळे भाषा जरा गावाकडची आहे... मला कायम ग्रामीण भूमिका असलेले प्रोजेक्टच मिळतील असं नाही. कोणतीही भूमिका मिळू शकते. कधी भाषेची अडचण येऊ नये, यासाठी भाषेवर काम करतेय.
एवढ्यात कुठला सिनेमा पाहिलाय? आणि काय वाचताय सध्या?
- कालच मी पुष्पा २ पाहिला, आज अॅनिमल सिनेमा पाहणार आहे. रोज किमान एकतरी सिनेमा पाहते. वेबसिरीजही पाहते. पुस्तकांबद्दल सांगायचं झालं तर पुन्हा एकदा पुअर डॅड रिच डॅड वाचायला घेतलंय.
प्रत्येकजण स्वप्न पाहतो, मुलीही स्वप्न पाहतात आणि स्वप्न साकारही करतात. मात्र, अनेक मुलींना स्वप्न साकार करण्यासाठी अवकाश दिला जात नाही, दहावी-बारावी झाली की मुलींचे हात पिवळे केले जातात, त्यांच्या स्वप्नांचा बळी घेतल्या जातोय असं कधी वाटतंय का?
- प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा आणि पाहिलेली स्वप्न साकार करण्याचा अधिकार आहे. हिंदीतील मोठ्या लेखिका महाश्वेता देवी म्हणतात, सपने देखने का अधिकार पहला मौलिक अधिकार होना चाहिए... मुलींना स्वप्न पाहू दिली पाहिजेत... दुसरं म्हणजे, कुठलेही आई-वडिल आपल्या लेकीचं अहित चिंतत नसतात. बापाला सगळ्यात जास्त काळजी कशाची राहत असेल तर आपल्या लेकीच्या लग्नाची... लेकीचं भलं झालं पाहिजे, म्हणून बाप चांगला जावई शोधत असतो. त्यात बापाचं काही चुकत नाही. पण, मुलींना जे काही करायचं असेल ते त्यांनी आपल्या घरच्यांना, आपल्या आई-वडिलाना सांगायला पाहिजे. घरातूनच जर विरोध होत असेल तर मुलींना कणखर झालं पाहिजे. मुलींनी स्वप्नांचा पाठलाग केला पहिजे.... स्वप्नांसाठी भिडायला शिका. घरच्यांनाही भिडा. पण, तुम्ही स्वप्न पाहणं थांबवू नका.
मुलींनी जीन्स वैगरे घालण्यालाही बऱ्याचदा विरोध होतो. मंदिरातही बऱ्याचदा तोकड्या कपडे घालून जाण्याला मनाई असते...
- पैलवान असल्यामुळे माझी चाल मुलींसारखी नाही. त्यामुळं बऱ्याचदा मित्र-मैत्रिणी मलाही टोकतात. पैलवान म्हटलं की, कपडे शॉर्ट आणि टाईट असतात. अन्यत्र जेव्हा बाहेर असते, तेव्हाही अंगात पुरुषीचं कपडे असतात. मला त्यात कंफर्ट वाटतं. मात्र, माझ्या कपड्यांवरही कमेंट येतात. मात्र, आपण आपलं काम करत राहायचं. तु्म्हाला जसं हवंय, तसं जगा. जे कपडे आवडतात, ज्या कपड्यांमध्ये कंफर्ट वाटतं, ते कपडे घाला... फक्त आईवडिलांच्या विश्वासला तडा जाऊ देऊ नका.
तुम्ही स्वत: कुस्तीपटू आहात, त्यामुळे मुद्दाम हा प्रश्न विचारतो... एका ठराविक वयानंतर मुलींचं खेळणं बंद होतं. शाळेत खेळाच्या तासाला मुली फक्त बसून असतात. आठवीनंतर तर खेळाचा तासच नसतो. या सगळ्याबद्दल काय वाटतं?
- बाहेरच्या देशात खेळाला फार प्राधान्य दिलं जातं. तिकडे मुलगा असो वा मुलगी, त्याला स्पोर्ट्समध्ये टाकतातच. त्यामुळेच तुम्ही बघा, त्यांच्याकडे मेडल्स जास्त आहेत. पण, स्पोर्ट्स केवळ मेडल जिंकण्यासाठी नाही. खेळाचे अनेक शारिरिक फायदे आहेत, त्यामुळे मुलांसोबत मुलींनीही खेळलं पाहिजे. आपण खेळलोच नाहीतर आपल्या शारीरिक क्षमतांची वाढच होणार नाही. दुसरं असं की, आठवीनंतरही खेळाचा तास असावा असं मला वाटतं. मुली खेळत नाहीत, असं तुम्ही म्हणालात. त्याची अनेक कारणं आहेत. मुलींना खेळ आवडत नाहीत, अशातला भाग नाही. बऱ्याचदा खेळाचे तास कुठले तरी पुरुष शिक्षकच घेतात. परिणामी, मुली खेळात भाग घेत नाहीत. मुलींना खेळण्याासाठी मोकळं वातावरण उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यासाठी पुरुष शिक्षकांसोबत महिला शिक्षणकही शाळेत असणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी खेळ शिकवण्यासाठी महिला शिक्षकच नाही. हा सगळ्या व्यवस्थेचा भाग झालाय. तो बदल होईल, तेव्हा होईल. पण, आपण आल्यात बदल करू शकतो ना... त्यामुळे मुलींनी स्वत:त बदल केला पाहिजे. मुलींनी खेळात हिराराने भाग घेतला पाहिजे. बागडलं पाहिजे.
तुम्ही कधी कुणाला 'नाही' म्हटलं?
- हो, मी स्पष्टपणे बोलणारी मुलगी आहे. मला जमणार नाही, माझा नाद करू नका, मला शक्य नाही, हे अनेकांना बोलतेय. मी घरच्यांनाही बऱ्याचदा काही गोष्टींसाठी थेट नकार दिलाय. मला वाटतं, मला स्वप्न पाहण्याचा आणि नाही म्हणण्याचा अधिकार आपल्याला जपता आला पाहिजे.
