मला समजलेला ‘तो’


    ...आणि माधवी हजारों लोकांसमोर उभी स्टेजवर ‘सशक्त नारी पुरस्कार’ स्वीकारत असताना अचानक भावूक झाली, पण तिच्या बोलण्यातून तिचं कर्तृत्व, तिचा आत्मविश्वास, तिचं धैर्य, तिला मिळालेली साथ, जीवनातला संघर्ष स्पष्ट झळकत होता. बोलताना तिला गहिवरले. शेताचा वाफा गच्च भरुन फुटावा असे तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरले आणि तीच्या तोंडून शब्द निघू लागले- “...आणि जेव्हा ‘तो’ माझ्या आयुष्यात आला, माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मी स्वतःसाठी उभी राहायला शिकले, स्वप्न पहायला शिकले, जग समजायला लागले आणि सर्वात महत्त्वाचे मी स्वतःला भेटले...” तिचे शब्द थांबताच संपूर्ण सभागृह उभे राहून तिच्यासाठी अर्थातच त्या दोघांसाठी टाळ्या वाजवत होते. माधवी तिथेच उभी राहून समोर उभा असलेल्या, तिच्यासाठी टाळ्या वाजवत असलेल्या हर्षलकडे पाहत होती आणि पाहतच राहिली. तिच्या नजरेत आत्मविश्वास, आपलेपणा आणि आपल्या संघर्षाचे सार्थक झालेले दिसत होते. तिच्या भरारीला आता कुणी मागे खेचणार नसल्याचे जाणवत होते. कोणत्याही संकटाचा सामना करण्याची हिंमत तिच्या मनगटात आली होती. आव्हानांना पायाखाली चिरडून मी पुढे जाईल असा आत्मविश्वास तिला आला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर गीता पळतच माधवीकडे येवू लागली. बॉडीगार्डने अडवले. माधवी उच्चारली, “येवू द्या त्यांना...” गीता कशीबशी स्वतःला सावरत माधवीसमोर येवून उभी राहिली.  

“मॅडम, मी एक वर्किंग वुमेन आणि गृहिणीदेखील आहे. पण मला हे सगळं मॅनेज नाही होतं, तुम्ही हे सगळं सांभाळता आहात. इथे प्रत्येकजण पुरुषांना नाव ठेवण्यामागे धावत असतो आणि वाईट नजरेनेच पाहतो. तुम्ही इतक्या आपुलकीने त्यांच्याबद्दल एवढ्या गोष्टी कशा सांगू शकतात? मला असं वाटतं, माझ्या नवऱ्याला मी नाही आवडत, ते माझ्यासोबत जास्त बोलत पण नाहीत, त्यांना नुसतं काम, काम आणि काम एवढच हवं असतं.. मी काय करू ओ मॅडम?  माझ्यासोबत अशा काही घटना घडल्या ज्यामुळे माझा पुरुष प्रजातीवरचा विश्वासच उडालाय, मला सगळे अपराधी वाटू लागले, सगळे वाईट असतात हे माझ्या डोक्यात खोलवर रुजलेय. एका बाईचं दुःख कुणाला समजणार? माहेरी सर्वांना वाटते मी खूश आहे, पण माझ्या आयुष्यात काय चालू आहे मी त्यांना नाही सांगू शकत, सासरी काही बोलायला गेलं तर उगीच भांडणं वाढतात. मी काय करू मॅडम, मला सांगा ना…” 

    गीताचे केविलवाणे बोल ऐकून माधवीने तिला शांत केले. शांत निवांत शेजारच्या एका खुल्या मैदानावर नेले. शांत बसवले. चालत-चालत तिची सर्व कहाणी ऐकून घेतली आणि समजूनही घेतली. 

       माधवी बोलू लागली, “हे बघ बाळा, हे फक्त तुझ्यासोबत घडत नाही, तर अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात, त्यांनाही चालता-बोलता अशा अनुभवांचा सामना करावा लागतो; परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येकजण तसाच असेल. आपण एका व्यक्तिवरून पूर्ण जगाला जज नाही करू शकत बाळा. ऑफिसचे काम, घरचे काम त्यात होणारी तुझी धावपळ, पुरुषांबाबतीत आलेले तुझे अनुभव या सर्वांचा परिणाम तुझ्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होत आहे. याचा परिणाम राग, वैताग, चिडचिड यांमुळे काही गोष्टी समजून घेण्याची आपली क्षमता अन्  गुणवत्ताही कमी होते. याचा परिणाम आपल्या कौटुंबिक जीवनासोबतच व्यावसायिक आणि सामाजिक जीवनातही होतो. गुण्यागोविंदाने चालू असलेली आपले नातेसंबंध अचानक विस्कळीत होतात, अशा परिस्थितीत कोणतीच गोष्ट सांभाळणे शक्य होत नाहीत आणि एखाद्यावरचा विश्वास जातोच सोबतच आपण परत कुणावर विश्वास ठेवू शकत नाही असा विचार मनात पक्का होतो.”

      माधवी पुढे स्व-अनुभवांचे कथन सांगू लागली, “बाळा! माझ्या बाबतीतही असेच झाले होते,  मुलांसोबत बोलायची मला नेहमी भीती वाटत असे. का माहीत का? लहानपणाासून म्हाताऱ्या आजीबाई, शेजारच्या काकू म्हणायच्या, “पोरी, शाळेत चालली आहे, कॉलेजला चालली आहेस, कोणत्या पोरासंग बोलू नको हं. दुनिया लई वाईट हाई बाई...” गावाकडचं शिक्षण, मी आज्ञाधारक मुलगी, नाही तर नाहीच बोलणार. शाळेतही मुले –मुली सेपरेट बसायचे. त्यामुळे कधी वर्गातल्या मुलांसोबतसुद्धा बोलता आलेच नाही, तर मग बाहेरची अनोळखी पुरुष तर खूपच दूर... आपण मानव प्रजातीतील दोन भाग असलो तरी बालवयातच असे समजले जणू आपण एकमेकांचे शत्रूच आहोत. पण जेव्हा ‘तो’ माझ्या आयुष्यात आला, सर्व काही बदलले.. आम्ही एकाच कॉलजमध्ये एकाच वर्गात शिकलेलो. तो गणितात तरबेज होता, सर्व शिक्षकांचा लाडका विद्यार्थी. तसा तो गुणीच होता, मल्टि टॅलेंटेडही होता, पण हे काय मला पटायचे नाही, कारण मीपण माझ्या शिक्षकांची लाडकी विद्यार्थीनी होते आणि माझ्या शिक्षकांना अजून दुसरा विद्यार्थी प्रिय वाटतो, ही गोष्ट मला आवडायची नाही, यावरून मी त्याचा खूप राग राग करायचे. वर्गात कायम आमची नोकझोक चालू असायची. तो भांडण करतो हे मला अजिबात जमायचे नाही, डोक्यात त्याच्याबद्दल कायम रागच होता. एके दिवशी परिक्षा उशीरा सुटली, मला घरी निघायला उशीर झाला, थेट रात्रीचे 10 वाजत आले तरी मला बस मिळत नव्हती आणि तिथून एकही गाडी जाताना दिसत नव्हती. माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. अजून अर्धा तास वाट पाहिल्यानंतर एक चार चाकी गाडी दिसली, भाडे वाहतूक करणारीच होती. गाडी लांबून दिसल्या – दिसल्या लगेचच मी वर हात केला, “थांबवा, थांबवा...” ओरडले. गाडी माझ्याजवळ येवून थांबली. गाडी थांबली तशी मी भितीने लटपट झाली, पूर्ण घामाघूम झाले, थंडीच्या दिवसांत सुद्धा माझ्या कपाळावरुन, डोक्यातून पाण्याचे थेंब टपकत होते- का? का तर मी पाहिले गाडीमध्ये सर्व पुरुषच बसलेले होते, एकही स्त्री नाही, सुनसान रस्ता, माणूस तर लांबच एकही कुत्रासुद्धा दिसेना, अशा रात्रीच्या प्रसंगी मनात नको नको ते विचार येवू लागले. एक कॉलेजची एकटी मुलगी अशा प्रकारे.. बापरे! अक्षरशः मी भीतीने थरथरत होते. इतक्यात आतून आवाज आला, “अरे मधु! तू इथे आहेस?” मी ताडकन डोळे उघडले अन् पाहू लागले, “कोण आहे तो?” “अगं ये ये बस, मी तुझ्यासाठीच थांबलो होतो, तुझ्या पप्पांचा मला फोन आलेला, ते येत आहेत, चल तोपर्यंत आपण जावूयात..” त्या आवाजाने माझ्या हृदयाची धडधड अजूनच वाढली होती. तो उतरून खाली आला. माझ्याकडे तोंड करून उभा होता, बाकी सर्वाँना त्याची फक्त मागची बाजू दिसत होती. तो मला हातवारे करत बोलत होता, घाबरु नको, काळजी करू नकोस मी सोबत आहे. डोळ्यांनी मला विश्वास देत होता, मी तुला घरापर्यंत व्यवस्थित सोडतो. तो समोर उभा होता. त्याला पाहून पहिल्या वेळेस मला त्याच्यासाठी राग नाही तर आपुलकीची भावना येत होती. तो दुसरा कुणी नाही, मी वर्गात ज्यावर रागवायचे, बोलणे खावू घालायचे, तो माझा मित्र होता-‘हर्षल’. त्याला माझ्या मनाची अस्वस्थता समजली होती. माझ्या जीवात जीव आला. मी मान डोलावली आणि त्याच्यासोबत गाडीत बसले. तो मला ओळखतो हे पाहून इतर लोकांनी मला दुर्लक्षित केले. नाही तर माझ्या मनात आलेले विचार आणि तेव्हाची परिस्थिती त्यावरून खूप काही झाले असते असा माझा गैरसमज. तो मला घरी सोडवण्यापर्यंत आला. त्याने आईला नमस्कार केला. मी सर्व हकिकत सांगितली, तोपर्यंत बाबा आले नव्हते, ते मला पाहण्यासाठी थेट माझ्या कॉलेजमध्ये गेले होते, तेवढ्यात बाबा पण आले. बाबा दिसताच सर्वप्रथम मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागले. बाबांनी मला शांत केले. मी बालपणापासून खूप भित्री मुलगी होते, पण आज हा प्रसंग घडल्यानंतर मी कसं सहन करेल याची त्यांना काळजी वाटू लागली. मी अनोळखी पुरुषांना इतकी घाबरते हे त्यांना माहीत होते, म्हणून त्यांनी मला एकटीला कधी कुठे जावू दिले नाही.  बाबा आणि हर्षल प्रथमच एकमेकांना भेटत होते आणि बोलत होते, बाबा त्याला हातात हात देवून ‘धन्यवाद’ देवू लागले. थोड्या वेळाने सर्व नॉर्मल झाले, त्या दोघांच्या गप्पा रंगल्या, दोघेही खूप वेळ बोलत होते. थंडीमुळे बाबांनी त्याला थांबण्यास आग्रह केला, तरी तो तसाच थंडीत काकडत घरी गेला. पहाट होत आली तरी मला झोपच लागत नव्हती. मनात एकेका प्रश्नाने सुरुवात झाली, मी आजपर्यंत ज्या मुलाचा तिरस्कार करायचे, आज वेळप्रसंगी त्यानेच माझी मदत केली, तो तसाच शांतपणे जावू शकत होता, मग त्याने माझी मदत का केली? माझ्या मनात माझ्या वागणुकीसाठी अपराधी असल्याची भावना येवू लागली. मनात नाना तऱ्हेच्या प्रश्नांनी उधान आणले होते. मी खरंच कोणत्या पुरुषाला समजून घेतले का? किंवा माझ्या कोणत्या मित्राशी मी कधी नीट वागले आहे का? कधी कुणाच्या भावना समजून घेतल्या का? बाबा नेहमी रागवतानाच पाहिले, पण त्यामागचं कारण त्यांच्या मनाची घालमेल कधी समजून घेतली आहे का? किंवा कमीत कमी समजून घेण्याचा विचार तरी माझ्या मनात आलाय का? मी आई, ताई, आजी, मावशी, सर्वांशी गप्पागोष्टी करायचे, मला त्यांचे दुःख, अडचणी, संघर्ष, त्यांची रोजची पायपीट सर्व माहीत आहे; पण कधी माझ्या बाबांच्या आतला माणूस मी समजून घेतलाय का? त्यांच्यात पण आईसारखीच माया आहे, ती पाहण्याचा प्रयत्न तरी केलाय का? ते माझ्यावर किती प्रेम करतात, मुलगी म्हणून मी कधी त्यांची काळजी घेतली आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांना वाचा फोडणारा माणूस माझ्या आयुष्यात हर्षल बनला. त्याच्याबद्दल मनातला राग आपोआप ओसरू लागला आणि त्याची जागा मित्रत्वाने घेतली. हळूहळू त्याच्या बोलण्यातून पुरुषांच्या वेदना, दुःख, अडचणी जाणवू लागल्या. जबाबदारीच्या ओझ्याखाली दडपलेला बाबा दिसू लागला. माझ्या सुरक्षेसाठी माझी ढाल बनलेला माझा भाऊ दिसू लागला.  हे एका दिवसात नाही झाले, भरपूर वेळ गेला. किंबहुना कित्येक वर्षे गेली असे मी म्हणेल. माझ्या दमलेल्या बाबाची कहाणी मला ऐकाविसी वाटू लागली. माझा नवरा जगासमोर धिप्पाड पर्वतासारखा उभा राहतो, पण त्याच्यातले लहान मूलाचे मन पहावेसे वाटू लागले. आजोबांच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यामागची व्यथा समजून घ्यावीशी वाटली. खऱ्या अर्थाने मला एक पुरुष समजून घ्यावासा वाटला….” माधवीचे बोल ऐकून सीता निशब्द झाली, जसे तिच्याही अंतर्मनाने तिला हे प्रश्न केले आहेत असे वाटू लागले. 

    ती माधवीला प्रश्न विचारु लागली, “मॅडम, तुम्हाला समजलेला ‘तो’(पुरुष) नेमका कसा आहे?” मधु हसून म्हणाली, मला समजलेला ‘तो? 

    मला समजलेला ‘तो’ काहीसा असा आहे – जन्मत: मुलगा झाला म्हणून आनंद होतो, दाही कोसापर्यंत पेढे वाटप होतात. एकदाच भरभरून, मनभरून आनंद होतो. नंतर त्याने शाळा, कॉलेज पूर्ण करून त्याने पैसे कमवावेत, या अपेक्षा असतात, असे करत करत अपेक्षांचे ओझे त्याच्यावर लादले जाते. वाढत्या वयानुसार त्याच्यात शारीरिक, मानसिक, भावनिक बदल घडत आहे नेहमी जाणवते पण काय आहे, कुणाला विचारू, कसे विचारू मनात न्यूनगंड तयार होतो, अपेक्षित मार्गदर्शन मिळत नाही. घरात चार मुली असल्या तरी मुलगा हवाच असतो, का? कारण आपली जबाबदारी, आपल्या अपेक्षा आपण त्याच्याकडून पूर्ण करुन घेवू शकतो. मुलगी सासरी जाणार शेवटी ते परकं धन आहे, पण मुलगा तो तर कायम इथच राहणार ना! मग आपली जबाबदारी, खर्च तोच पूर्ण करणार. आपल्या प्रॉपर्टीला वारस लावू पण त्या बदल्यात त्याला त्याच्या स्वप्नांचा त्याग करावाच लागेल, हे मात्र खरे! तो बिचारा कुटुंबाची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो, कुणाला काय पहिजे सर्व पाहतो, घरखर्च त्याच्याच जीवावर चालतो. घरातल्या कर्त्या पुरुषाने महिनाभर सुट्टी घेतली तर आता काय खाणार? घर कसे चालणार? इथून प्रश्न तयार होतात. हे बघ बाळा, स्त्रीत्व हे भरभरून ओसंडून वाहणारं असतं. आपण बाकीच्या गोष्टी समज, गैरसमज जरा बाजूला ठेवून थोडसं पुरुषांनाही समजून घेवू. त्यांच्या अंतर्मनात चाललेली हळहळ जरा शब्दांत समजवू. त्यांच्या वेदना, दुःख, संघर्ष त्यांनी जो मनातच दाबून ठेवलेला आहे, त्यासाठी जरा आपलं मन त्यांचं व्यासपीठ बनवू, त्यांनाही मोकळ्या मनाने व्यक्त होवू देवू. जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेला ‘तो’ त्याला आपल्या हृदयात मऊशा गादीवर जरा डोकं टेकवायला, विसावा घेयला जागा देवू. त्यांच्याही अंतर्मनाचा भाव समजून घेवू. मुलं किंवा पुरुष खूप सरळ असतात. सरळ, साध्या, सोप्या भाषेत सांगितलेल्या गोष्टी त्यांना समजतात, आपल्यासारखे कोड्यात किंवा गोष्टी फिरुन बोललेले त्यांना समजत नाही. तोपण आपल्या घराला घरपण येण्यासाठी दिवसभर राबराब राबतोच ना, ऑफिसला जा, शेतीची कामे बघ, घरातही काय हवं नको ते बघ, म्हाताऱ्या आई – बाबाचे , आजी –आजोबचे म्हणा आजारपण आहेच, लहान लेकरंबाळं त्यांचं शिक्षण आहेच, सर्वच एका वेळी हॅन्डल करतोच ना! पैसा-पैसा जोडत सर्व करतो. मला किती दुःख आहे, किती त्रास आहे, हे आपल्याला सांगत नाही. माझ्या कुटुंबीयांना काही कमी पडू देणार नाही हे नक्की म्हणतो. तो उपाशी राहतो, पण माझं लेकरू पोटभर जेवलेय ना हेच त्याच्या ध्यानामनात. मी जे दिवस काढले ते माझ्या लेकरांनी काढायला नको. एक बाप म्हणून त्याची भूमिका असो किंवा भाऊ म्हणून किंवा नवरा म्हणून किंवा मुलगा म्हणून सर्वच ठिकाणी तो परफेक्ट बनूनच काम करतो ना! रोजची धावपळ, कामाचा ताण, वाढतं वय, वाढत्या जबाबदाऱ्या त्याला सतावतात, पण तो कधी बोलून दाखवतो का गं ? जर तो आपला नवरा आहे म्हणजे आपण एकमेकांच्या आपल्या आयुष्याचे पार्टनर आहोत. तर आपली जबाबदारी आहे ना गं आपणही त्याला थोडं समजून घ्यावं. कधी त्याच्या जागेवर उभा राहून देखील विचार करावा. त्याच्या मनातले वादळ शांत करायला आपण छोटीसी फुलपाखरू बनू. जगासमोर नाही पण आपल्या कुशीत तरी तो मनभरून रडू शकतो, मोकळा श्वास घेवू शकतो, इतकी मोकळीक त्याला देवू. त्याच्यावर नेहमी संशय घेण्यापेक्षा कधी तरी ‘मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे’ असे बोलू, कितीही संकट आली तरी आपण सोबत सामना करु, तू घाबरू नकोस मी तुझ्यासोबतच आहे, एवढा जरी धीर त्याला देवू. तुम्ही त्याची मदत नका करू, पण त्याचा आधार तरी बना. पुढे संकट दिसल्यावर जेव्हा तो तुम्हाला सोबत पाहिल त्याच्यामध्ये आपोआप त्या संकटांचा सामना करण्याची ताकद येईल. तो एकटा पर्वत इकडचा तिकडे नेवू शकतो, त्याच्यात एवढे सामर्थ्य आहे, पण त्यासाठी अगोदर त्याला आत्मविश्वास तरी देवू. “तू खचून जावू नकोस, सगळं ठिक होईल, तू खूप मजबूत आहेस, तू जे करतोस योग्य आहे, मला तुझ्यावर विश्वास आहे, तू बरोबर करशील, तू तुझ्या कामात पराभवी झाला तरी खचून जावू नको, मी नेहमी तुझ्या सोबत आहे.” एवढे ऐकून त्याचे काम नाही होणार, मुलांना प्रॅक्टिकल सोल्यूशन हवं असतं, पण त्याला बळ मिळेल, नवी ऊर्जा मिळेल. त्याला तोडण्यापेक्षा त्याला जोडायला शिका. त्याला बोलणारे, ओरडणारे, तिरस्कार करणारे भरपूर आहेत, पण त्याला मायेने समजून घेणारे खूप कमी. त्याची, त्याच्या कामाची प्रशंसा करून प्रोत्साहन देवू शकतो. त्याला आपण सोबत असल्याची आपलेपणाची जाणिव करुन द्या. गर्दीच्या जगात त्याला एकटेपणा भासू देवू नका, स्वतःसोबतच आपल्या पार्टनरच्या मेंटल हेल्थची  काळजी आपणच घ्यायची आहे. शेवटी तो माणूस आपला आहे.  लग्न झाल्यावर एका मुलीला जेवढी चिंता असते, मी नवीन घरी कशी अॅडजेस्ट करणार, मला समजून घेतील का? तशी मुलांनाही असतेच ना! ती मुलगी बायको बनून घरी येणार, तिच्या वडिलांनी तिची जबाबदारी आपल्यावर सोपवली, मी तिला खूश ठेवीन का? तिला इथे काही त्रास तर होणार नाही ना? तो बोलत नसला तरी त्याच्या मनात हे असतेच. त्याच्या बेरंगी आयुष्यात सुख, समाधानाचे रंग भरने एवढे जरी आपल्याला जमले तरी आपले नाते समृद्ध होईल. स्वतःवर लक्ष द्या, स्वतः ची काळजी घ्या, सोबतच आपल्या माणसाचीही काळजी घ्या, त्यालाही समजून घ्या. मलाही या गोष्टी खूप उशीरा समजायला लागल्या बघ! माझे मुलं, नातवंड उद्या मला विचारतील “तुझ्या नजरेत पुरुष कसा असतो गं?” काय उत्तर देवू आपण? तो क्रूर, भीती दाखवणारा, कमजोर, बलात्कारी, भांडण हाणामारी करणारा असा? नक्कीच नाही. प्रत्येकजण वाईट असतो असे नाही. कमी– जास्त (Plus- minus) सर्वांत असतात गं, पण आपण त्याला कोणत्या दृष्टीकोनातुन पाहतो आणि त्याचे आयुष्य कोणत्या दिशेने नेतो, हे आपल्यावर आहे. कधी तो रागात असेल, जरा समजावून घेवू. कधी शांत असेल, त्याला धीर देवू. कधी त्याला एकटेपणा वाटत असेल, आपण सोबत असल्याची आपल्या आधाराची जाणिव करुन देवू. कधीतरी त्यालाही आपल्या खांद्यावर दोन क्षण विसावू देवू, कधीतरी आपणही त्याला समजून घेवू.. 

    “आपल्याही आयुष्यात संघर्ष आहे आणि आपल्यापेक्षा जास्त त्यांच्याही. गृहिणी असल्यास आपण घरात बिनधास्त राहतो, तेव्हा तो आपल्यासाठी राबत असतो. संसारासाठी कवडी–कवडी जमा करतो. एका बाईचं सर्वस्व तिचा नवराच असतो. त्याचं असणं सुध्दा परिपूर्णता असते. त्याच्या छायेखाली आपण सुरक्षित असतो, तो असताना कुणाची हिंमत होत नाही आपण नजर वर करून सुद्धा या बाईकडे पाहावं, त्याचा दबदबा आपली खरी सुरक्षा असते. तो आपल्यावर खूप प्रेम करतो, पण त्याची प्रेमाची भाषा ओळखता आली पाहिजे,  जी प्रत्येकाची वेगळी असते. कधी तो अचानक सरप्राइज घेवून येतो, कधी तो घट्ट मिठी मारतो, कधी तो जेवलीस का? बरी आहेस का विचारतो, कधी तो आपल्यासाठी गरमागरम नाष्टा बनवतो, कधी तो घरकामात मदत करतो, कधी तो आपल्याला फिरायला घेवून जातो. कधी तो अचानक हसायला लावतो, हे ओळखता आले पाहिजे. त्याच्या परफेक्शनपेक्षा त्याचे एफर्ट्स पाहिले पाहिजेत. तो आपल्या नात्यासाठी किती मेहनत घेतो आहे, यावर एकदा तरी नजर टाकता आली पाहिजे. तो आपल्याला रागवतोय, ओरडतोय, चिडतोय. त्यामागचे कारण ओळखता आले पाहिजे, त्याच्या रागवण्यामागेही प्रेमभाव आहे हे समजले पाहिजे. मला पण या गोष्टी उशीरा समजायला लागल्या, तेव्हा जेव्हा मी मनापासून त्याला समजून घेवू लागले. हर्षलमुळे माझ्या मनातील प्रत्येक भीती नाहीसी झाली. मी निडरपणे अनोळखी व्यक्तींशी बोलू लागले, एकटी प्रवास करू लागले. माझ्या प्रत्येक कामात मला माझे बाबा प्रेरित करायचे. त्या दोघांमुळे खरं पुरुषत्व काय असते हे समजले.”

       माधवी पुढे बोलू लागली, “आयुष्यात कधीच माघार घ्यायची नाही, हार मानायची नाही आणि आपली चुकी नसताना अजिबात घाबरायचे नाही, हे समजले. मी आजारी असल्यावर मला हॉस्पिटल मध्ये घेवून जाणारा, माझी काळजी घेणारा माझा भाऊ, एकदा खेळाच्या स्पर्धेत मला दुखापत झाली , हातातून रक्त येत होते, दादाने पळत जाऊन माझ्यासाठी first aid आणले, वेळेवर उपचार झाल्यामुळे मी ती स्पर्धा जिंकले, तेव्हा माझ्यासोबत नेहमी भांडणारा तो, त्याच्यातला मायाळू, काळजी करणारा मुलगा मी पहिल्या वेळेस पाहिला. मुलांना पण मन आहे गं, ते आपण समजून घेतले पाहिजे. त्यांना त्यांचा पर्सनल स्पेस दिला पाहिजे, नेहमी त्यांच्यावर दबाव टाकने, तू हेच कर, असच कर यापेक्षा तू जे करशील व्यवस्थित करशील असा विश्वास दाखवला तरी ते त्यांचे शंभर टक्के एफर्ट्स देतात. एकदा ठरवलेली गोष्ट पूर्णत्वाला नेतातच. पुरुषांमध्ये खूप एनर्जी असते, फक्त ती कुठे आणि कशी वापरायची याचे गाईडन्स त्यांना मिळाले पाहिजे. आज मी जे काही आहे यामागे मला पाठिंबा आई- बाबांचा, माझ्या भावाचा, माझा नवरा अर्थातच माझ्या हर्षलचा आहे, किंबहुना माझ्या आयुष्यात भेटलेला प्रत्येक पुरूष मला काहीतरी शिकून गेला आहे. जसे आई, ताई महत्वाची तसेच बाबा, काकाही तेवढेच महत्त्वाचे आहेत. माझ्या प्रत्येक गोष्टीत धीर देणारे, माझा पाठीराखा बनणारे, मला आत्मनिर्भर करणारे तेदेखील पुरुषच आहेत. नकारात्मक गोष्टी पाहण्यापेक्षा त्यांच्यातील सकारात्मक, चांगल्या  क्वालिटी पाहता आल्या पाहिजेत. मला समजलेला पुरूष हादेखील माणूसच आहे. आपला माणूस, आपल्यासाठीचा माणूस… आपण एका गाडीची दोन चाके आहोत, कुणीच मागे राहून किंवा पुढे जावून चालत नाही, सोबत जोडीने चालावे लागते आणि हेच खरे ‘नात्यातील संतुलन’ आहे.” 

    माधवीचे बोल ऐकून गीता निशब्द झाली. तिच्या मनात कुठेतरी ममत्व जागृत होत होते. तिला तिच्या खऱ्या आयुष्यात पहिल्यांदा जाणवले मी पण त्याला समजून घ्यायला हवे. उद्या मी पण सांगू शकेल मला समजलेला ‘तो’...

-अनुराधा नवनाथ कराळे 
पाथर्डी, अहिल्यानगर 
ई-मेल : anuradhakarale010@gmail.com