Tara Bhawalakar : दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bhartiy Sahitya Sammelan) अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि संत साहित्याचे अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर (Dr. Tara Bhawalakar) यांची निवड करण्यात आली. रविवारी पुण्यातील साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी ही निवड केली.
राजधानी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेकांची नावे पुढे येत होती. संमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. तारा भवाळकर यांचे नाव आघाडीवर होते. यानंतर प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, समाजसेवक अभय बंग आदींच्या नावांचीही चर्चा होती. डॉ. तारा भवाळकर, विश्वास पाटील यांची नावे शेवटपर्यंत कायम राहिले. त्यामध्ये भवाळकर यांच्या नावाला एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आलं.
संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी साहित्य महामंडळाने शनिवारी (दि. ५) आणि रविवारी (दि. ६) पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक घेतली. या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली. त्यात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. घटक संस्थांकडून साहित्य महामंडळाकडे प्राप्त झालेल्या नावांवर चर्चा करून भवाळकर यांची निवड करण्यात आली.
१९३९ साली पुण्यात जन्मलेल्या तारा भवाळकर यांनी त्यांचं सबंध आयुष्य लोकसाहित्याच्या अध्ययन, चिंतन, संशोधन आणि लेखनासाठी समर्पित केलं आहे. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, मराठी भाषा आणि साहित्य, नाट्यसंशोधन, संत साहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला, लोकसाहित्य यावर त्यांनी भरपूर संशोधन व लेखन केले आहे. आणि लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलने यांत भाग घेतला आहे. ललित लेखन, अनुवाद, व्याख्याने, आकाशवाणीसाठी लेखन, यांसह मराठी विश्वकोश, समाजविज्ञान कोश, मराठी वाङ्मयकोश, आणि ग्रंथकोश यातील अनेक महत्त्वाच्या नोंदी त्यांनी लिहिल्या आहेत. आजवर त्यांचे ३६ पेक्षा अधिक ग्रंथ प्रकाशित झाले असून, ३२ पेक्षा अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
तारा भवाळकरांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा नाट्य प्रकारांची जडणघडण शोधली. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठच आहे.
गाजलेली पुस्तके
आकलन आणि आस्वाद (साहित्यिक), तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक), निरगाठ सुरगाठ (लेखसंग्रह), प्रियतमा ( गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा), बोरीबाभळी (रा.रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना), मधुशाळा (हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर), मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह), मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे, मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद, महामाया, माझिये जातीच्या (सामाजिक), मातीची रूपे (ललित), मायवाटेचा मागोवा, मिथक आणि नाटक, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा, लोकनागर रंगभूमी (माहितीपर), लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा (माहितीपर), लोकपरंपरेतील सीता, लोकसंचित (वैचारिक), लोकसाहित्य : वाड्मयप्रवाह, लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर), लोकांगण (कथासंग्रह), संस्कृतीची शोधयात्रा (माहितीपर), स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (वैचारिक), स्नेहरंग (वैचारिक), तिसऱ्या बिंदूच्या शोधा ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.
१ एप्रिल१९३९ रोजी जन्मलेल्या ताराबाई वयाच्या ८३ व्या वर्षीही लेखन करत असतात. साठ वर्षांहून अधिक काळ त्या सातत्याने साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. मराठीतील नामवंत लेखिका, प्राध्यापिका, एक कसदार वक्त्या अशी त्यांची विविधांगी ओळख आहे. लोकसाहित्याची स्त्रीवादी समीक्षा प्रस्थापित करण्यात डॉ. तारा भवाळकर यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.
ताराबाईं भवाळकरांनी १९५८ ते १९७० पर्यंत माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून काम केले. १९७० ते १९९९ पर्यंत सांगलीच्या श्रीमती चंपाबेन यांनी वालचंद शहा महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापिका म्हणून काम केले. १९५८ पासून अध्यापनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ भवाळकर सन १९९९ ला सेवानिवृत्त झाल्या. निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकॅडमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकॅडमीमध्ये त्यांनी अतिथी प्राध्यापिका म्हणूनही काम केलं.
अनेक पुरस्कारांनी ताराबाई भवाळकरांचा गौरव…
ताराबाई भवाळकरांच्या कार्याचा गौरव विविध संस्थांनी केला आहे. यामध्ये लेखन आणि संशोधनासाठी महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि.मा. गोखले पुरस्कार, मसाप गौरव पुरस्कार, पुणे नगर ग्रंथालयाचा श्री. ना. बनहट्टी पुरस्कार, मुंबई विद्यापीठाचा डॉ. अ. ना. प्रियोळकर पुरस्कार यासारख्या आदी पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. याशिवाय, महाराष्ट्र फाऊंडेशनने त्यांना गेल्या वर्षी पुण्यात जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
