Laapataa Ladies : प्रसिद्ध दिग्दर्शिका किरण राव (Kiran Rao) यांनी दिग्दर्शित केलेल्या 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) या चित्रपटाची 'ऑस्कर २०२५' साठी भारतातर्फे निवड करण्यात आली आहे. भारतीय चित्रपट महासंघाने (Film Federation of India) सोमवारी चेन्नई येथे ही घोषणा केली. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्श, कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर क्रू यांच्यासाठी हा अतिशय आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे.
मोठ्या पडद्यावर गाजलेला 'ॲनिमल', राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळम चित्रपट 'अट्टम' आणि कान्स महोत्सवात विजेता ठरलेला 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' यांसह २९ चित्रपटांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र आमिर खानच्या प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘लापता लेडीज’ने यात बाजी मारली. आसामी दिग्दर्शक जाहनू बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील १३ सदस्यांच्या निवड समितीने एकमताने या चित्रपटाची निवड केली.
चित्रपटाविषयी...
हा चित्रपट महिला सक्षमीकरणावर आधारित असून पितृसत्ताक संस्कृतीवर भाष्य करतो. चित्रपटाची कथा दोन नववधूंच्या अवतीभोवती फिरते, ज्यांची त्यांच्या पतीच्या घरी जाताना रेल्वे प्रवासादरम्यान अदलाबदल होते. या चित्रपटात कोणत्याही प्रसिद्ध कलाकारांना न घेता, नवख्या कलाकारांनी काम केले आहे. प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोयल आणि रवी किशन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात छाया कदम यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपट समीक्षकांपासून प्रेक्षकांना या सिनेमाची अनोखी गोष्ट भावली होती. १ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अल्पावधीतच २५ कोटींचा गल्ला जमवला.
"ऑस्कर चित्रपट सोहळ्यात 'लापता लेडीज' हा चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करेल याबाबत खूप आनंद झाला आहे. हा माझा मोठा सन्मान आहे. माझ्या संपूर्ण चमूच्या अथक परिश्रमामुळे आज हे यश आम्हाला मिळाले आहे. मला आशा आहे की, हा चित्रपट भारताप्रमाणेच जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल."
- किरण राव, चित्रपट दिग्दर्शिका
