महिन्याभरापूर्वीची गोष्ट. बसने प्रवास करत होते. सकाळी सहाची वेळ होती, त्यामुळे फारशी गर्दी नव्हती. प्रवास होत जाईल, तशी बसमध्ये गर्दी वाढली. बसमध्ये आपल्या शेजारी कोण असावे, ही गोष्ट आपल्या हातात नसते. बाजूचा प्रवासी एखादी स्त्रीच असावी, असा प्रयत्न स्त्रिया का करत असतात, हे पुढील प्रसंगावरून लक्षात येते.
शेजारच्या सीटवर एक स्त्री बसली होती. तिच्या शेजारीही एक स्त्रीच होती, परंतु तिचा स्टॉप आला आणि ती उतरली. साहजिकच ती उतरल्यानंतर मागच्या सीटवरचा एक पुरुष उठून तिला म्हणाला, "आतल्या बाजूस सरका." तिने उलट म्हटलं, "तुम्ही आत बसा, मी इथेच बसणार."
एरवी खिडकीशेजारची जागा सर्वांना हवी असते, परंतु आपला सहप्रवासी जर पुरुष असेल तर स्त्रिया फार विचार करून निर्णय घेतात. आपल्या शेजारी पुरुष बसलेला आहे या जाणिवेने ती बाई अंग चोरून बसली. आपल्या शेजारच्या माणसाला चुकूनही आपला स्पर्श होऊ नये किंवा गाडी वळली की, आपण त्या बाजूला झुकू नये म्हणून पुढच्या सीटचा हँडल घट्ट पकडून बसली.
गाडी पुढे जाऊ लागली, तसा हा माणूस चुळबूळ करू लागला. पायांची अनावश्यक हालचाल करणे, पाय पसरणे अशी कृत्ये करत अध्यपिक्षा जास्त सीट त्याने व्यापले आणि त्या बाईला स्पर्श होईल अशा प्रकारे त्या बाईच्या बाजूला सरकायचा प्रयत्न करू लागला. तशी ती बाई अधिकच अंग चोरून बसली. त्या माणसाच्या हालचाली पाहून तिने त्याला एक-दोन वेळा नीट बसण्याविषयी बजावलेदेखील. तेवढ्यापुरतं तो चपापला, पण त्याचे चाळे काही थांबत नव्हते. मध्येच झोप लागल्यासारखे करत त्या बाईच्या अंगावर डुलकी मारणे, खांद्यावर डोके ठेवणे असे प्रकार चालूच होते.
या प्रकाराने ती बाई वैतागली होती. बसमध्ये फार गर्दी असल्यामुळे ती आहे तिथेच पर्स छातीशी घट्ट पकडून आपले मुटकुळे करून बसली.
पुढे नाष्ट्यासाठी गाडी एका स्टँडवर थांबली. तेव्हा तो माणूस उतरला. जाताना म्हणाला, "माझी ही जागा राखून ठेवा, मी आलोच." या माणसाने इथून उठावे असे त्या बाईला वाटत होते. आयतीच संधी चालून आल्यामुळे त्या बाईने पुढच्या सीटवरील बाईला आपल्या शेजारी बसण्याची विनंती केली. त्या माणसासाठी पुढच्या सीटवरील जागा धरून ठेवली आणि शेजारी एका स्त्रीला बसवून ती निश्चिंत झाली.
काही वेळात तो माणूस हातात खाण्याचे साहित्य घेऊन आला. त्या बाईकडे रागाने बघत म्हणाला, "ती माझी जागा होती, मी तुम्हाला सांगितले होते." पुढच्या सीटकडे बोट करत ती म्हणाली, "तुमच्यासाठी जागा पकडली आहे. तिथे बसा." असे म्हणताच, फणकाऱ्याने तो मागे जाऊन बसला.
प्रवासातील असे अनेक प्रसंग नोकरीच्या निमित्ताने वा इतर कारणांनी बसमधून प्रवास करणाऱ्या स्त्रियांना नेहमीच अनुभवास येतात. आयुष्यात किमान एकदा तरी असले 'नकोसे स्पर्श, खिळलेल्या नजरा, जाणीवपूर्वक मारलेले धक्के स्त्रियांनी अनुभवलेले असतात. गर्दीचा फायदा घेत काही वेळा स्त्रीच्या अंगाला स्पर्श करणे, अंगावर रेलणे यांसारख्या घटना स्त्रिया सहनच करत असतात.
दिवसा प्रवास करताना, अनेक माणसांदेखत असे कृत्य करतात, तर हे लोक कुणीच नसतील त्या वेळी परस्त्रीशी कसे वागत असतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही! मध्यमवयीन आणि कित्येकदा वयस्कर पुरुषही याला अपवाद असत नाहीत. वयस्कर पुरुषांच्या वयाचा आदर करत स्त्री निर्धास्तपणे बसते, पण थोड्याच वेळात तिला कळून येते की, आपला समज चुकीचा होता. तरीही 'आपल्याला कुठे बसमध्ये राहायचंय? आपला स्टॉप आला की उतरायचं आहे', असा विचार करून स्त्रिया असले प्रकार सहन करत राहतात.
भरलेल्या गाडीतसुद्धा स्त्रीला शेजारच्या पुरुषाची भीती का वाटते? असुरक्षित का वाटते? कुठलीही स्त्री म्हणजे पुरुषांना आपल्या मालकीची वस्तू वाटते का? यांसारखे अनेक प्रश्न मनात काहूर माजवतात. अर्थात, सर्वच अनुभव असे नसतात. प्रवासात चांगले पुरुषही असतात, जे स्त्रियांना जागा देतात, त्यांचे सामान उचलायला मदत करतात, त्यांच्या मुलांना आपल्या मांडीवर बसवून घेतात. पण असे काही घटक असतात, ज्यांच्यामुळे सार्वजनिक वाहनाने एकटीने प्रवास करायला स्त्रीला भीती वाटते. त्यामुळे खेड्यापाड्यांत अजूनही स्त्रीला एकटीला प्रवासाला जाऊ देत नाहीत.
असे करायला पुरुष का धजावत असतील? याबद्दल विचार करताना असे जाणवते की, आपली काहीही चूक नाही हे स्त्रीला माहीत असले तरीही स्त्रिया घाबरतात, त्या प्रतिकार करत नाहीत, ही मानसिकता अशा मुजोर पुरुषांना चांगली ठाऊक असते. त्यामुळे ते इतके निगरगट्ट बनतात की, भरल्या गर्दीत किंवा मोजकेच प्रवासी असू दे, बिनादिक्कतपणे एखाद्या स्त्रीला त्रास देतात.
स्त्रिया का घाबरतात? आपण काही बोललो तर सगळे आपल्याकडे बघतील, ही भीती बाईला वाटत असते. खरे तर एखाद्या स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिच्याकडे टक लावून पाहणे, तिला स्पर्श करणे, काही अश्लील टिप्पणी करणे हे संबंधित पुरुषासाठी लाजिरवाणे आहे; परंतु आपल्याकडे एखाद्या स्त्रीविषयी कोणी वावगे बोलले, तसे कृत्य केले तर आधी त्या स्त्रीविषयी प्रश्न निर्माण केले जातात. त्यामुळे स्त्री असे चुकीचे कृत्य करणाऱ्याला दटावण्याची हिंमत करत नाही. परिणामी अशा लोकांचे फावते. खरे तर चुकीचे कृत्य, गैरवर्तन करणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे. स्त्री घाबरते, हे माहीत असल्यामुळे ह्या लोकांना बळ मिळते आणि ते निर्ढावतात.
यावर उपाय काय? बसमध्ये किंवा कुठेही, अशा अपप्रवृत्तींना धडा शिकवला पाहिजे. नजरेत जरब ठेवून, हिंमत करून जाब विचारणे हा एकच पर्याय आहे. तरच अशा समस्त अपप्रवृत्तींना चाप बसेल. स्त्रीने हिंमत धरून उभे राहिले पाहिजे आणि विरोध केला पाहिजे, खडसावायला शिकले पाहिजे. वेळ आली तर गैरवर्तनाबद्दल हात दाखविण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. तरच तुम्ही मुक्तपणे आणि आनंदाने जगू शकता. याबरोबरच आपल्या आवाज उठविण्याने इतर दहा जणींना हा प्रसंग धाडस देऊन जाईल हेही लक्षात ठेवले पाहिजे.
याउलट जाऊ दे, 'उगंच तमाशा नको. लोक माझ्याकडे बघतील, मला नावे ठेवतील' असा विचार करत राहिलो तर अशा प्रसंगांना सहन करण्याव्यतिरिक्त काहीही पर्याय नाही, हे निश्चित !
कॉलेजच्या जीवनातही प्रवास करताना उनाड तरुणांची अशी भीती वाटायची आणि वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही तीच भीती कायम आहे, असा अनेक मैत्रिणींचा अनुभव आहे. माणसे वेगळी, प्रवृत्ती त्याच. बाईचे वय कितीही असू देत, ती 'बाई' आहे एवढेच अशा प्रवृत्तींना पुरेसे असते. त्यात ती एकटी आहे म्हणजे आपल्या मालकीचीच, असा जणू त्यांचा पक्का ग्रह बनतो. एकटी बाई समाजातील पुरुषांना 'संधी' न वाटता ती आपल्यासारखीच एक माणूस आहे आणि तिने मुक्तपणे संचार करणे ही आपली जबाबदारी आहे असे वाटेल, तेव्हाच नव्या बदलाला सुरुवात होईल !
-यशवंती शिंदे, कोल्हापूर
