लढणाऱ्या पोरी



लढणाऱ्या पोरी

घाबरत नसतात लढायला

त्या बळ एकवटून लढतात

रोज नाउमेद होऊन पुन्हा झेपावतात


लढणाऱ्या मुलींवर

ताणले जातात अनेक बाण

त्यांचं उज्ज्वल कर्तृत्व दडपून


लढाई फिरवली जाते

मुलींच्या शरीराभोवती

ठरवले जाते त्यांना बदचलन

गुदमरवले जातात त्यांचे श्वास

तरी त्या श्वासत राहतात


लढणाऱ्या मुली रडत नसतात

त्यांचे अश्रू साक्षीदार असतात 

विखारी पुरुषत्वाचे,

त्यांचे हुंदके पुरावा असतात

अनेक माणसांच्या पिढ्यांना संदर्भ म्हणून ध्यानात ठेवण्यासाठी


लढणाऱ्या मुली

दुबळ्या असतात म्हणून हात जोडत नसतात

त्या माणसाच्या विनयाचे संचित असतात


लढणाऱ्या मुली हरत नसतात कधीही

त्या लढ्याच्या आरंभालाच जिंकलेल्या जातात


लढणाऱ्या मुली तुकवत नाहीत मान

बलाढ्य सम्राज्यासमोर

त्या उभी करतात जिद्दीची अभेद्य भिंत

कुणाही भणंगाला न ओलांडता येणारी


लढणाऱ्या मुली सोबत घेतात पुरुषांची

त्या एकट्या पडतील म्हणून नव्हे; 

तर सहवेदनेनेचे भागीदार म्हणून

त्यांच्या खांद्यावर डोके टेकवतात


लढणाऱ्या मुलींना

दाखवले जाते मरण्याचे भय

पण लढाईतच त्यांचा पुनर्जन्म झालेला असतो


लढणाऱ्या मुली

लढता लढता लाखो मुलींना लढवय्या बनवत असतात

लढणं महत्त्वाचं आहे हे पक्कं माहीत असणाऱ्या

या मुली फक्त जिंकण्यासाठी लढत नसतात

त्यांना माहिती आहे

त्यांची लढाई रस्ता करणार आहे

मुलींच्या अनेक पिढ्यांना

आणि त्यांच्या संघर्षाच्या कथा 

दंतकथा बनून घराघरातून सांगितल्या जातील

अनेक हतबल पोरींना आणि मुजोर पोरांनाही


लढणाऱ्या पोरींच्या पिढ्या करणार नाहीत माफ

त्यांच्या आनंदी आयुष्याचा खेळ करणाऱ्याच नव्हे तर

कुंपणावर उभे राहून हा खेळ पाहणाऱ्यांनाही....


लढणार्‍या पोरींनो,

कोणत्याही बाईला चुकली नाही

योनीच्या अवतीभोवती गुरफटलेली

बाईच्या अस्तित्वाची लढाई...


ही लढाई दूरची आणि मोठी आहे

तुम्ही थकला आहात मान्यच... 

तुमचं हतबल होणं

मानव जातीची हार आहे.


तरी, 

तरीही लढा पोरीनों!

तुमचा लढा गरजेचा आहे

तो इतिहास घडवणार आहे,

तुम्ही तोवर लढत राहा

जोवर-

पुरुषांना त्यांच्या माणूस होण्याची लाज वाटणार नाही

आणि 

सत्ताधीशाचा पायउतार होणार नाही!

- लक्ष्मी यादव