टिकली वरुन सुरु झालेली चर्चा आता वेगळ्या वळणावरुन गंभीर होत आहे. भिडे जी भाषा बोलत आहे तिला दीर्घ ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. स्त्रिशिक्षण बंदी मोडीत निघून स्त्रिया शिकू लागल्यानंतर वनिता विश्वाने आपला स्पेस निर्माण केला. स्त्रीस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य यासाठी पुरुषवर्चस्वविरोधी आवाज उठू लागला. कुटुंबात स्त्रियांना समान आणि सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून स्त्रियांचा वैयक्तिक पातळीवर संघर्षही फार निकराचा आहे. स्त्रिया शिकून पुढे जाणे,त्यांनी आपल्या दमनाच्या इतिहासावर बोट ठेवणे, काळ्याकुट्ट अमानवी भुतकाळावर प्रश्न करणे, मूक बनून न राहणे हे त्यांना खपण्यासारखे नाही. स्त्रियांनी फार तर शिकून अर्थार्जन करावं, नटावं-सजावं-मुरडावं, खावं-प्यावं, मुलाबाळांना जन्म देऊन त्यांना घडवावं, पण स्त्रियांच्या शोषणास कारणीभूत वेद पुराण स्मृती ग्रंथ आदिवर बोलू नये. शिळ्या कढीला उत कशाला, असे म्हणत महिलांच्या शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीचे उदात्तीकरण करायचे मात्र त्यांच्यावर झालेल्या अमानवी अत्याचाराची आठवण काढायला नको. प्रश्न विचारायला नको. यासाठी आटापिटा करणारेही बहुत आहेत. म्हणून भिडेसारखे किडे टिकलीच्या निमित्ताने आवाज दाबण्यासाठी वळवळत असतात.
पण जातीवर्णव्यवस्था विरोधाचं काय?
चातुर्वर्णधर्म, धर्मशास्त्र आणि तथाकथित संस्कृतीने महिलांना अतिशुद्र म्हणजे अस्पृश्यांपेक्षाही खालचे स्थान देऊन अपमान आणि छळ केला. शिक्षणापासून वंचित ठेवले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी धर्ममार्तंडांचा आणि धर्मनियमांचा विरोध झुगारून, हालअपेष्टा सहण करून महिलांना शिकविले. त्यावेळी धर्मनियमांचा जाच ब्राम्हण स्त्रीयांना सर्वाधिक झाला. हे वास्तव शिकलेल्या स्त्रीयांना माहीत असुनही काही सन्माननीय अपवाद सोडले तर सावित्रीबाईंनी दिलेल्या या शिक्षण आणि शहाणपणाचा वापर आपल्यावर अन्याय करणाऱ्या त्याच धर्मव्यवस्थेच्या मजबूतीसाठी करत असल्याचे दिसून येते. सनातनी विचाराच्या तंबूतील अम्मा, बापू, गुरुजीच्या, धार्मिक, राजकीय लोकांच्या नादी लागतात.ज्या फांदीवर बसावे तिलाच करवतीने कराकरा कापून टाकावे, असा प्रकार. याला स्त्रियांयासाठी कष्ट घेणाऱ्या सावित्रीबाईं विषयीची कृतघ्नता समजावी की स्वतःविषयीचाच कृतघ्नपणा समजावा? अशा बोटचेपेपणामुळे भिडेसारखे शिरजोर होतात.
जोतीराव-सावित्रीबाई आणि त्यांचे बहुजन व ब्राह्मण सहकारी यांनी १८४८ साली पुण्यात 'नेटिव्ह फिमेल स्कूल्स'ही स्त्रीशिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेच्या एका वार्षिक परिक्षेच्या निमित्ताने स्त्रीशिक्षणाविषयी पुढीलप्रमाणे भूमिका मांडली गेली."स्त्रियांस विद्या शिकवून त्यांची सुधारणूक करणे, त्यांस त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान देणे व त्यांच्या टल्याणाची काळजी बाळगणे, हे हिंदू लोकांच्या विचारांस विरुद्ध वाटते आणि केवळ इतकेच नाही तर असे केले असता त्यात अधर्म घडतो अशी त्यांची समजूत पडून गेली आहे. त्यांच्यामते स्त्रियांनी निरंतर दास्यत्वात वागावे, त्यांनी विद्या शिकू नये, सुशिक्षित होऊ नये, धर्म जाणू नये, पुरुषांच्या मडळीत जाऊ नये, पुढाऱ्याच्या विचारात आपले मत देऊ नये,सारांश कोणत्याही गोष्टीत त्यांनी पुरुषाची बरोबरी करू नये..."(पृ.१२, महात्मा फुले समग्र वाङ्मय,महाराष्ट्र शासन, मुंबई.२०१३) पावणेदोनशे सालापूर्वीची ही विदारक स्थिती. स्त्री शिकली नसती तर ती चूल अन् मूल,अज्ञान अन् अंधकारात, सतीप्रथा,बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, उंबरठ्याच्या आत, लक्ष्मणरेषेसारख्या मनुसंहितेने आखलेल्या चाकोरीबद्ध रिंगणात स्थानबद्ध असती. स्त्रीशिक्षणाचा प्रारंभ, प्रवास कितीतरी संघर्षपू्र्ण राहिले आहे. तरी त्यात स्त्रिया शिकल्या, टिकल्या सागरतळाच्या पासून तर अवकाशातील अनंत पोकळीत किती समर्थपणे विहरतात त्या, टिकलीविना. स्त्री म्हणून नव्हे तर माणूस म्हणून. हे अमान्य असणाऱ्यांना टिकलीचा प्रश्न सद्यस्थितीतही कळीचा झाली आहे.
-अनुज हुलके, नागपूर
.jpg)