पुरुषसत्ताक व्यवस्थेचा बळी पुरुषही



पुरुषसत्ताक व स्त्रीसत्ताक व्यवस्थेच्या फरकाचा आढावा घेतला तर पुरुषसत्ताक व्यवस्थेत शोषण व्यवस्था मूळ धरून जास्त चिवट झालेली दिसून येते. स्त्रीसत्ताक व्यवस्थेत पुरुषवादी चळवळीची आवश्यकता भासली नाही. पण पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीवादी चळवळ, स्त्रीवादी विचारधारेची गरज भासली. कारण तिच्या (स्त्री च्या) होणाऱ्या शोषणामुळे. म. ज्योतिराव फुले म्हणतात की, कुटुंब व्यवस्थेचा रथ नीट चालवायचा असेल तर स्त्री पुरुष ही दोन चाके समान सक्षम हवीत. पण इथली पुरुषसत्ताक व्यवस्था मात्र हे मान्य करीत नाही. त्यांच्या मते इथली स्त्री शिकली तर ही कुटुंब व्यवस्था ढासळेल;  खरेतर ती शिकली, सक्षम झाली तर इथल्या भेदाच्या, शोषणाच्या त्याच्या कृल्प्त्या तिला कळतील आणि म्हणूनच  या व्यवस्थेच्या बाजूने असणारे जाणीवपूर्वक स्त्री शिक्षण नाकारत होते. (अजुनही तिच्या स्वअस्तित्वाचे, समानतेचे भान देणारे शिक्षण ते नाकारताहेत.)  आणि आज स्त्रिशिक्षणामुळेच घटस्फोट वगैरे होऊ घातले अशी आरोळी ठोकतात. खरे तर इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेनेच ही वेळ आणली आहे.ज्या कुटुंब व्यवस्थेच्या इमारतीचा पाया शोषण, असमानता यावर आधारित असेल ती इमारत किती वेळ तग धरणार.?  कधी ना कधी ती ढासळणारचं ना..!

          सिमोन  बोउआर म्हणतात की स्त्री ही जन्मत नाही तर घडवली जाते. अगदी बरोबर. दुसरीकडे पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषसुद्धा पुरुषीसत्तेला बळकटी देण्यासाठी त्या मानसिकतेचा घडविल्या जातो. याचा फायदा त्या व्यवस्थेला जरी होत असला तरी स्त्रीसोबत या व्यवस्थेचा बळी पुरुष देखील आहे. पुरुषांच्या व्यक्तिमत्व विकासात ही पुरुषसत्ताक व्यवस्था अडसर ठरते. भावनिक दृष्टया पुरुष 'मर्द को कभी दर्द नही होता' या अहंभावनेपायी  उद्धवस्तही होतो. सामाजिक, कौटुबिक अवास्तव अपेक्षांचे डोंगर त्याचे सहज, सुंदर जगणे अशक्य करते. 'पुरुषी अहंपणा' जी त्याच्यात ही व्यवस्था ठासून भरते. ती त्याला समानतेचा आग्रह करु देवू पाहत नाही. लहानपणापासून त्याच्यावर केलेले संस्कार मी 'श्रेष्ठ' म्हणून, यामुळे  त्याच्या पेक्षा जास्त शिकलेली, जास्त पगार कमविणारी, जास्त यशस्वी स्त्री पाहून हा पुरुष निराशेच्या गर्तेत जाताना दिसतो. (जे अतार्किक आहे) पुरुषी अहंपणा कधी कधी इतका विकोपाला जातो की विकृती जन्माला येवून समाजमन सुन्न होते. या व्यवस्थेने फक्त स्त्रीचेच शोषण केले नाही तर इथल्या पुरुषांचे व त्यांच्या अपत्यांचे, एकूणच संपुर्ण कुटुंबाचे देखील शोषण तिने केले आहे. करीत आहे. पण  हे इथल्या पुरुषाला कधी कळणार? ज्याला कळते ते पुरुष मात्र समानतेचा आग्रह करतात.  इथल्या स्त्रीवादी चळवळीसोबतही ते आहेत. स्त्रीवादी विचारधारा स्त्रीसत्ताकतेचा आग्रह मुळीच धरत नाही, हेही समजून घेणे महत्वाचे आहे. (स्त्रीवादी चळवळीविषयी अनेक गैरसमज जाणीवपूर्वक समाजात पसरविले आहेत)  सर्वच भेदाच्या पल्याड जाऊन समतेचा आग्रह यात आहे. तश्या संस्कृतीचा आग्रह यात आहे. जी संस्कृती श्रेष्ठ- कनिष्ठ असा भेद करते ती संस्कृती स्त्री, पुरुष, व ट्रांस जेंडर या सर्वांनीच समजून घेणे आवश्यक आहे.  तेव्हा कुठे विवाह व कुटुंबविषयक बाबींचा आपण पुन्हा नव्याने विचार करु शकू. संस्कृती ही एकमेव अशी गोष्ट आहे की   धार्मिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक याचे संचलन तिच्या हातात असते. वरील बाबीतील अराजकता संपवायची असेल तर भेदावर आधारलेली संस्कृती व समतेवर आधारलेली संस्कृती कोणती? याचा शोध घेवून समताधिष्ठित संस्कृती रूजविण्यासाठी  कार्यतत्पर असणे गरजेचे आहे. गरजेचे ठरणार आहे.

- माधुरी वसंतशोभा