प्रा. नयन भादुले यांच्या दोन कविता



१. ती सहन करत राहते, ती वाट पाहत राहते... 

आयुष्यभराच्या ओल्या
जखमा देऊन 
तो संथपणे जगत राहतो
कसं जमतं त्याला 
रोजचं हे निर्विकार जगणं
आपल्याच धुंदीत 
आपल्याच स्वप्नांची 
पूर्ती करत 
तो स्वतःतच मग्न होत 
आयुष्यभर... 
तिच्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब 
तिच्याही नकळत
ठेवत असतो, अगदी तंतोतंत 
परिघाच्या बाहेर तिची जाण्याची 
फक्त इच्छा जरी झाली तरी 
तो कुशलतेने घालतो कुंपण 
मग ते भावनांचं असेल अथवा
स्वतःला तिची आवश्यकता आहे
असं भासवण्याचं
किंवा तिचं त्याच्या व त्याच्या परिवारासाठी असलेलं कर्तव्याचं... 
भावनांच्या आणि शब्दांच्या जाळ्यात
तो सतत ओढत राहतो तिला
अगदी कुशलतेने हे जाळ इतकं पक्क विनतो
की तिलाही कळत नाही कि ती त्या जाळ्यामध्ये कधी गुंतत जाते... 
वयाच्या ४५ नंतर...
तिला त्याच्या या सर्व कारनाम्यांमुळे
असह्य होत जगणं... 
पण ती तेव्हा असते हतबल
ना त्याला सोडून जाऊ शकते 
ना त्याला जसं पूर्वी सहन केलं
तसं करू शकते... 
कारण तीच तिच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाने 
एवढी वेढलेली असते कि
तिच्यावर कोणीतरी
विना अपेक्षा करावे प्रेम
अगदी आत्मीयतेने तिची करावी काळजी
याची ती पाहत असते वाट 
घेईल कोणीतरी तिला समजून 
आणि पक्षांप्रमाणे तिलाही 
उंच भरारी घेता येईल या अपेक्षेसह...

२. ऋतूचक्र

किती दिवसांनी भेटतेस सखे
त्रास होत आहे या सगळ्याचा
भावनांचा कल्लोळ झेलत 
हे वेदनामयी क्षण ... 
आणखी किती झेलू
काय अन् किती बोलू
आजकाल, अगदी सक्तिचा आराम करत
फक्त तुझ्या आणि माझ्याच विचारात, 
तू येतेस तेव्हा गतकाळातील 
आठवणी दाटून येतात... 
नि नदीमायला होत आहे अताशा
होय, ते इतके दमवणारे असते की 
कधीकधी थकवा घालवण्यासाठी इलाजच करावा लागतो जालीम
प्रत्येक महिन्याला भेटणारी तू
अशी विलंबाने भेटून ढवळून टाकतेस अंतरंग
एकतर भेटीत सातत्य ठेव
नाहीतर मैत्री विसर...

- प्रा. नयन भादुले-राजमाने'साहित्यनयन'
   लातूर