१)
ते म्हणाले
तू कपाळावर कुंकू लाव.. मग मी उत्तर देईन..
नंतर ते म्हणाले
हा ड्रेस बदलून साडी नेसून ये..मग मी उत्तर देईन
त्या नंतर ते म्हणाले
नऊवारी लुगडं नेसून ये. मग मी उत्तर देईन..
आणि त्याच्या नंतर ते म्हणाले
तू सोवळे गुंडाळून ये मग... मी उत्तर देईन..
हे सगळे पचल्यावर
मनू पुन्हा सोळाव्या शतकाच्या स्मृतीत गेला
आणि नवरा गेलेल्या स्त्रीला म्हणाला
कुंकवा शिवाय जगणं व्यर्थ
सती जाण्यात मोठा अर्थ
तुझा जन्म ठरेल कृतार्थ...
तेव्हा तिला कळून चुकल
आता विचाराला धार आणली पाहिजे..
तसेच याला आणि याच्या भंपकपणाला
जोड्यान हाणलं पाहिजे..
तिने जोडा उगारताच
त्यांन मुजोरिने प्रश्न केला
तू हे करायचं धाडस केलंसच कसं ??
ती म्हणाली
आपल्या परंपरागत लबाड्या कबूल कर... मी उत्तर देईन..
तेव्हा काही हालचाल न करताही
त्याच्या कपाळाला घाम फुटला
मग... अखंड घाम फुटला...
२)
श्रम संस्कृतीत
सर्वच मनुष्य मात्रांच्या
कपाळावरच्या घामाचं महत्व
सर्वात जास्त असत..
आणि
वर्ण विकृतीत
महत्वाचं ठरवलं जात
स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू.....
आपण संस्कृती जपू..वर्धिष्णू करू..
विकृतीचे किडे वळवळणारच
अधून मधून....
विशिष्ट बागेतला चविष्टआंबा
खाल्ल्यावर जन्माला
आलंही असेल एक बाळ..
कपाळाविनाच..
३)
ही भारतभू सर्व धर्मियांची आहे
हा भारत
व्यक्ती व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
देणाऱ्या संविधानाचा आहे..
स्त्रीला गुलाम करणाऱ्या
मनुस्मृतीचा नाही....
भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व आहे..
पण विकृतांना काय कळणार
कप्पाळ ?
पण आता तरी आपल कपाळ आपण लिहू
आपले आहेत ज्योती- साऊ..
ऐक आता,
नवा काळ, नवे कपाळ
जे लादले जाते ते सगळ जाळ...
-प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
.jpg)