(कॉम्रेड गीता महाजन या अखिल भारतीय महिला फेडरेशनच्या ज्येष्ठ कार्यकर्ता आहेत. या माध्यमातून त्यांनी महिलांच्या हक्कांबाबत, त्यांच्यावरील शोषणांविरोधात अनेक लढे दिले. आंदोलने केली. कम्युनिष्ट म्हणून महिलांच्या शोषणाकडे पाहण्याची त्यांची विशिष्ट दृष्टी, त्यांचा अभ्यास, त्यांचं प्रत्यक्ष काम याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला माधुरी वसंतशोभा व पौर्णिमा मेश्राम यांनी)
प्रश्न : ताई तुमचं पुर्ण नाव, शिक्षण, तुमचं वय ?
उत्तर- माझं नाव कॉम्रेड गीता महाजन. शिक्षण ७ वी पास, टीचर ट्रेनिंग (वर्धा), सध्या वय ७५. वास्तव्य- नागपूर. मी जि. प. मध्ये शिक्षिका होती, नंतर माझी नोकरी गेली. पती शिक्षक होते आणि मी पुर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता.
प्रश्न: ताई तुमचा मार्क्सवादी विचारसरणीशी कसा परिचय झाला? अखिल भारतीय महिला फेडरेशनशी तुम्ही कशा जोडल्या गेल्या?
उत्तर- पती शिक्षक, मीही शिक्षिका (जि.प. यवतमाळ) त्यामुळे आम्ही खेडयापाडयात फिरलो. कुरई गावात असताना (वणीजवळ - यवतमाळ) अखिल भारतीय महिला फेडरेशनची पत्रिका (मासिक) माझ्या हातात पडली. ती नियमित वाचायला लागली. दरम्यानच्या काळात कॉम्रेड गणपत वाढई व गयाबाई पानघाटे यांच्याशी ओळख झाली. कॉम्रेड गणपत वाढई यांनी मला मार्क्सवादी विचारसरणीची ओळख करून दिली. नंतर मी तिथेच कम्युनिस्ट पक्षाची सदस्य झाली.
प्रश्न: महिलांच्या शोषणाकडे मार्क्सवादी विचारसरणीतून तुम्ही कसं पाहिलं? कसं पाहिलं पाहिजे?
उत्तर- महिलांना एकतर व्यक्ती म्हणून पुरुषसत्ताक व्यव्यस्था इथे मान्य करीत नाही. त्यामुळे तिच्यावर मालकीहक्क ही व्यवस्था प्रस्थापित करते. आणि म्हणून तिच्याकडून जे उत्पादन केलं जातं किंवा होतं त्यावर तिचा हक्क या व्यवस्थेला अमान्य आहे. तिची संतती हे तिचं उत्पादन आहे पण त्यावर मात्र तिचा हक्क ही व्यवस्था नाकारते. शिवाय तिचे श्रम या व्यवस्थेत मोजल्या जात नाही. आर्थिक व्यवहारात, निर्णयात तिला घरी गौण स्थान आहे. आजही तिला घरुन घालवून देणे सहज शक्य होते कुठल्याही वयात. कारण तिचं घर तिचं अजुनही नसतं, अगदी तिच्या नावावर असलं तरी. हे तिचे शोषणच आहे. स्त्रियांचे शोषण कसे होते.. किंवा एकूणच शोषण कसे होते हे समजून घेण्यासाठी मार्क्स मदत करतो. ते समजले की शोषणाविरुद्धच्या लढयांना त्या तत्वज्ञानाचं अधिष्ठान मिळेल. अलीकडे चळवळींच्या तत्वज्ञानाकडे दुर्लक्ष झाले आहे. तत्वज्ञानाशिवाय चळवळ मजबूत होत नाही.
प्रश्न: असं बोलल्या जातं की मार्क्स कालबाह्य झाला, आपणास काय वाटतं?
उत्तर: अजिबात नाही. तुम्ही काम करता म्हणजे तुम्ही तुमची ऊर्जा विकता असे मार्क्स म्हणतो. यातून शोषण कसे होते हे समजण्यासाठी मार्क्स आवश्यक आहे. स्त्रीचे लग्न होताच तिच्यावर नानाविविध जबाबदाऱ्या ही व्यवस्था टाकते. ऐन तरुणपणी तिच्यातल्या उर्मी, ऊर्जा अश्या खर्च होतात. अलीकडे शिक्षण व्यवस्थेतील बाजारीकरणामुळे तर मुलांच्या शिक्षणासाठी आई वडील (तरुण वयात) दोघेही चिंताग्रस्त व पिचलेले आहेत. आयुष्यभर यासाठीच त्यांना खस्ता खाव्या लागताहेत. हे शोषण आहे. तरुण मंडळी कॉंट्रेक्ट बेसवर ज्येष्ठांच्या तुलनेत कमी पगारात आपलं तरुण सळसळतं रक्त आटवित आहेत. हे शोषण नव्हे का?
भांडवलशाही व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना भांडवलदारांपेक्षा फारच कमी मोबदला मिळतो. ऊर्जा, उर्मी नष्ट होते ती वेगळीच. अंगमेहनतीची कामे करणारे मजूर यांना होणारे नानाविविध आजार हा प्रश्न आहेच. मग मला सांगा कार्ल मार्क्स कालबाह्य कसा?
प्रश्न- आज कुटुंब व्यवस्थेसमोर अनेक आव्हानं आपल्याला दिसताहेत. ती का आहेत? त्याला सामोरी कसं जाता येईल?
उत्तर: एकूणच स्त्रिया ज्या गतीनं शोषणाविरुद्ध लढल्या त्या गतीनं पुरुषांना शोषण कळलं नाही. त्यांचं त्याबाबतीलं आकलन कमी पडलं. त्यामुळे ही सगळी आव्हाने आहेत. पुरुषांनी लढे उभारले पण ते लिंगसमभाव, स्त्री-पुरुष समानता या अंगानी फार कमी. त्यांनी आर्थिक लढे, (वेतनासाठी) शैक्षणिक लढे दिली. एकूणच स्त्रियांचे या शोषणासबंधीचे आकलन व पुरुषांची यासंबधाने गती लक्षात घ्यावी लागेल. ही आव्हाने मगच पेलता येतील.
प्रश्न: तुम्ही जी महत्वाची आंदोलने केली, जी महत्वाची पदे भूषवली, या निमित्ताने जी तुमची ग्रंथसंपदा निर्मिती झाली त्याबद्दल थोडक्यात सांगा.
उत्तर: नागपूर येथील कामगार कॉलनी जी झोपड़पट्टी होती तिथे राहत असताना हिंदू- बौद्ध वाद काही समाजकंटक पेटवायचित तेव्हा आम्ही सुनीता शेन्द्रे(१९८० च्या दशकात) सोबत हिंदू-बौद्ध एकता हे आंदोलन उभं केलं होतं. त्यानिमित्ताने गुंडप्रवृत्तिच्या अनेक मुलांचं समुपदेशन केलं. अनेक गुंडाना वळणावर आणलं. त्यांनाच घेवून दिल्लीला साम्प्रदायिक विरोधी मोर्चा (१९८७) काढला होता. डंकेल प्रस्ताव विरुद्ध मोर्चा दिल्ली इथं १९९० साली विधवा पेंशन आंदोलन केलं. दारूबंदीसाठी मोर्चे काढले. प्रबोधन जागृती महिला मंडळ तर्फे अनेक महिलांना लघु उद्योग स्थापन करण्यासाठी मदत मिळवून दिली. ८ वर्ष बालकमंदीर चालवले. अखिल भारतीय महिला फेडरेशन तर्फे गावागावात महिला अत्याचार निवारण केंद्रे स्थापन केली. त्यामार्फत कोर्टात अनेक केसेस लढलो. न्याय मिळवून दिला.
मी अखिल भारतीय महिला फेडरेशनची राज्य उपाध्यक्ष, व जिल्हा सचिव म्हणून काम केले. अनेक पुरस्कार मिळाले. अखिल भारतीय महिला फेडरेशनची दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर अश्या अनेक ठिकाणी जी महत्वाची अधिवेशने, परिषद झाल्यात त्यात मी सहभागी होते. महत्वाच म्हणजे जे मला शिकता आलं, मला यानिमित्ताने जे टिपता आलं त्यांची काही पुस्तके झालीत. त्यात 'शालान्त परीक्षेत मुले नापास का होतात' , 'स्त्री अत्याचार व त्यास जबाबदार प्रवृत्ती,' 'स्त्रियालिटी', ' क्रांतीगीते', चरित्रलेखन अशा पुस्तिकांचा समावेश आहे.
प्रश्न: शेवटी जाता जाता आजच्या तरुण-तरुणींबद्दल चळवळीच्या अनुषंगाने काय वाटते? किंवा त्यांना काय संदेश द्याल?
उत्तर: येणारी पीढी मागच्या पीढीपेक्षा नेहमीच सक्षम असते, असे मार्क्स म्हणतो. शेंगदाण्याचं झाड बघा. जास्त खोल असलेले खालचे शेंगदाणे सडतात किंवा भरीव नसतात. पण त्यावरील शेंगदाणे टणक असतात. तशी येणारी पीढी असते. त्यांना त्यांची ऊर्जा वापरु द्या. त्यांना मोकळे सोडा. त्यांना त्यांचे प्रश्न कळले तर ते सोडविण्यासाठी चळवळी ते स्वतः उभारतील. किंवा जुन्या चालवळींना उभारी देतील. त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि तरुणांनीही आपल्या ऊर्जा त्यांचे होणारे शोषण याविषयी सतर्क राहिले पाहिजे. एवढंच यनिमित्ताने सांगेन.
.jpg)