प्रत्येक स्त्री
अंगणात
दारासमोर रांगोळी काढते,
रांगोळीत नाचणारा मोर काढते,
मोराच्या पिसाऱ्यात रंग भरते
अन् मग दिवसभर
घरात
थुईथुई नाचत राहते-
हुबेबुब मोरसारखी.
रात्री
उशिरान पुरुष येतो,
कोसळतो मुसळधार पावसासारखा घरावर
आणि तिच्यावरही.
तेव्हा विस्कटून जाते
अंगणात तिने काढलेली रांगोळी
अन् विस्कटून जातात
मोराच्या पिसाऱ्यात भरलेले
तिचे सगळे रंग !
●●●
तू आता काढून ठेव
ते तोडे, ती जोडवी :
तुझ्या पायांना जड झाले असतील.
तू आता उतरवून ठेव
त्या बांगड्या, त्या पाटल्या :
तुझ्या हातांवर त्याचे वळ उमटले असतील.
तू आता ठेवून दे
तो हार, तो कंठा;
भाराने तुझी मान आखडून गेली असेल.
पण तुझ्या केसांत माळलेला तो मोगऱ्याचा गजरा...
तो मात्र राहू दे... तस्साच !
तुझी उरलेली संध्याकाळ तरी
सुगंधित जायला हवी !
-प्रशांत असनारे
.jpg)