ती आमंत्रण देत नसते- हर्षा अजय मोडक

आज थोडं लक्ष त्यांच्याकडे पण देण्याची आवश्यकता आहे. ज्यांचं लक्ष सदैव महिलांकडे असत. ती काय घालते, ती कस बोलते, ती कशी वागते... असे अनेक.....




        एवढ्यातच मी एक फोटो बघितलेला त्यात काही स्त्रियांचे फोटो दाखवून... असे लिहिले की , "तुम मर्यादा में रहो दुनिया औकात में रहेंगी, माता को खुश करणे जाना है, शहरवालो को नहीं!"  अरे वाह ही तर लोकांची बरी जबरदस्ती आहे... स्त्री ने काहीही घालू नये... आता हे ठरवणारे लोक कोण? आणि तिने नीट कपडे घातले तरच दुनिया औकात मध्ये राहणार का? म्हणजे असं झालं सगळ्या दुनियेचा औकातीत राहण्याचा ठेका एका स्त्री कडेच आहे म्हणावा.

         अरे ती काहीही घालू शकते तिच्या काहीतरी चांगलंच घालण्यावर लोकांची एवढी प्रतिक्रिया कशाला हवी! स्त्रीला बदलण्याची गरज नाही आज. आज लोकांचा दृष्टिकोन बदलायची गरज आहे. पुरुष बनियान, चड्डीवर उघडा गावभर फिरतो तेव्हा नाही का अंगप्रदर्शन होत? पुरुषांच्या डोळ्यात वासना भरली की त्याला वयोवृद्ध बाई काय आणि पाच वर्षाचा कोवळा जीव काय सर्व सारखाच. आज बऱ्याच स्त्रिया न्यूड फोटोशूट करतात म्हणजे त्या वाईट नाही ना! त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होतो, तसेच वेश्याचं उदाहरण घ्या- त्या देहविक्रचा व्यवसाय करतात म्हणून माणूस म्हणून आपण त्यांना दुरावू नाही शकत. आधी आपल्या विचारसरणीत बदल हवाय. आपण सर्व गोष्टी सकारात्मक घ्याव्यात म्हणजे परिवर्तन घडेल.

        सिनेमा सृष्टीतल्या कलाकारांचं उदाहरण घ्या ते तर दररोज कपड्यांची फॅशन करत असतात. घरी मोठ्यानं समोर, लहानांसमोर बेफिकीर वावरतात त्यांच्यात का नाही उफाळून येत वासना. कारण त्यांचे विचार आणि तेही तेवढे प्रगल्भ आहेत. ते फक्त बाईच शरीरच बघत नाही. आणि मी पण अभिनय कोर्स केलेला आहे त्यात शिकवतात सुद्धा स्त्री असो वा पुरुष शरीर किती गौण आहे. स्पर्श कसा सहज घ्यायचा ते. आणि सर्वात महत्तवाचे हे प्रत्येकाचे आयुष्य आहे आपण कोण सांगणार त्यांना कस जगा ते.. जगू द्यावं, राहू द्यावं, घालू द्यावे कोण कस कपडे घालतंय ते त्यांच्या त्यांच्या मर्जीने.

      पुरुषाची नजर दूषित असेल ना तर त्याला पूर्ण कपड्यातली स्त्री ही उघडीच दिसणार आणि नजर स्वच्छ असली की बाळाला दूध पाजणाऱ्या महिलेत तो आपली माताच बघतो. अशा काही लोकांसाठी मुलींनी आणि स्त्रियांनी आपलं स्वातंत्र्य गमावू नये बंधनात जाऊ नये. प्रत्येकाच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर आपली काहीच हरकत नसावी. मुळात स्त्री, पुरुष संकल्पनेत स्त्री जरा वेगळी आहे म्हणून तिने मर्यादेत राहिले पाहिजे. असे विचार आपण आधुनिक युगात करत असू तर आपल्या प्रगतीला आपणच बाधक म्हणावे लागेल.

          तफावत तर काहीच नाही असती तर आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसली नसती व  सर्वच क्षेत्रात प्रगतही नसती. हे दुतोंडी लोक तिला कोणत्याही क्षेत्रात काम करताना का नाही बंधन घालत. आपापल्या सोईनुसार लोकांची मत बदलताना बघितली आहे. मग मी एक स्त्री म्हणून का लोकांच्या प्रत्येक विचारावर प्रतिक्रिया द्यायची, का मीं स्वतःला बंधनात घालायचं परत. फक्त शरीराचा फरक म्हणजे फरक नव्हे! पुरुष उघडा फिरला तरी त्याची तेवढी बदनामी होत नाही जेवढी एका स्त्रीची होते... का??? फक्त दोनच अवयव वेगळे आहेत म्हणून? अरे विज्ञान शिकतानासुद्धा स्त्री व पुरुषाची शरीर रचना शिकविली जाते. तीच शरीर सुद्धा एक शरीर म्हणूनच बघा. तिच्यात काही वेगळेपणा आहे हा भाव सोडून ती माझ्यासारखीच एक हाडामासाची  माणुस आहे अशी प्रगत विचारसरणी हवी आहे.

        कुमारी माता, विधवा यांच्याकडे आजही आपल्यासारखी शिकलेली लोक वेगळ्या नजरेतून बघत असतात. आपले आदर्श महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी असाच विचार त्या काळात  केला असता तर त्यांनी कुमारी मातांना आश्रय दिला नसता. त्या काळात त्यांचे विचार एवढे विस्तारित होते. आणि आज आपण साध्या गर्भपात झालेल्या मुलीकडे वाईट नजरेने बघतो, किंवा तिलाच दोष देतो. आणि विशेष म्हणजे हे तिला असं बोलणाऱ्या जास्तीतजास्त स्त्रियांचं असतात.

       कुठलीही मुलगी वा स्त्री काही वेगळे कपडे घालते म्हणजे ती पुरुषांना आकर्षित करायला घालते असे नव्हे, तर ती तिची पसंती असते. स्त्रियांना मर्यादेत ठेवण्यापेक्षा पुरुषांनी आपल्या मर्यादेत राहायची गरज आहे.

          थोडे नजरेच्या आडचे कपडे तिने घातले म्हणजे ती लोकांना आमंत्रण देतेय असा समज होत नाही. (Yes, I am available ) म्हणून. माझे विचार परखड आहेत वैचारिक बदल सर्वांमध्ये व्हावा हाच उद्देश्य.  परिवर्तनवादी बोलायला आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  कधी घाबरले नाही. घाबरले असते तर आजचे परिवर्तन आपण बघू शकलो नसतो.

बाकी वैचारिक स्वातंत्रही सर्वांनाच!

- हर्षा अजय मोडक
  नागपूर