रिप रिप रिप - प्रसेनजित गायकवाड



जन्म घेण्यासाठी
तिला करावी लागली अजिजी
जन्मानंतर तिला सांभाळून ठेवावे लागले
तिच्याजवळ त्याने ठेवलेले त्याचे शील त्याच्याचपासून

आयुष्यभर ती
स्वतःला चोरत राहिली
त्याच्या नजरेपासून

ती तीळ तीळ मरत राहिली
आणि त्याने उत्सव केले
तिला देवी म्हटले

सकाळी आई म्हटले
दुपारी ताई म्हटले
सायंकाळी माई म्हटले
आणि रात्री बाई म्हटले

स्वतःचा शक्तिपात लपवण्यासाठी
पुढे तिला शक्ती म्हटले

त्याने तिला
माणूस म्हटले नाही

तिच्याकडून जीवन घेऊन
तिला जगणे नकोसे केले

आज ती गेली
त्याने दुःखाचा पाऊस पाडला
रिप रिप रिप...

- प्रसेनजित गायकवाड

  नागपूर