प्रिय मुली…!



प्रिय मुली,
तुझ्या उत्क्रांती सोबत पृथ्वीही गतिशील झाली
असंख्य प्रश्नांची सोडवणूक करून 
तू सर्वश्रेष्ठ झालीस
तुझा इतिहास काळाच्या आधीचा
काळाच्याही पुढे जाऊन तू एकमात्र झालीसं…
तू होतिस बलशाली आणि सर्वशक्तिमान
तुचं घडवल्या प्रजाती
इथल्या संस्कृती आणि सभ्यता…
व्यवस्थेच्या लेखनीतून तू झालीस महावृक्ष
ओतप्रोत वाहणारा महासागर
किंवा सावलीसाठी उभं ठाकणारं निळंशार आभाळ…

तरीपण...

तू सतीसाठी जळत आलीस आजन्म
इज्जतीच्या नावाखाली दडून राहलीस पदराआड
गावाची किंवा देवाची म्हणून गेलीस ओरबडल्या 
तुझ्या मायेचा इटाळ म्हणून पडलीस खितपत  

प्रिय मुली,
ढोर वस्तीच्या बिराडात
घेतलास का कधी मोकळा श्वास
नाही…. नाही ना

मग आताही तू
कोंडवाडा तोडणार नाहीस का…?

- हेमंत दिनकर सावळे
  जि. वाशिम