महिलांचं लढवय्या नेतृत्व - जैब्बूनिस्साताई शेख

(सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देवून काम करणाऱ्या, अनेक सामाजिक आंदोलनं यशस्वी करणाऱ्या, प्रामुख्याने शेतकरी महिला चळवळीत अग्रेसर असणारं एक नाव म्हणजे जैब्बूनिस्साताई शेख. यांच्याशी संवाद साधला माधुरी वसंतशोभा व अर्चना खैरे यांनी.)




नमस्कार ताई! 

प्रश्न :  ताई तुमचं नाव, शिक्षण आणि बालपण याविषयी थोडक्यात सांगा.

उत्तर : माझं नाव जैब्बूनिस्सा मो.नासिर शेख. माझा जन्म २६/०५/१९५४ चा. वडील मो.नाजिर शेख पोलीस खात्यात नोकरीवर होते. त्यामुळे बालपण चांगले गेले. शिक्षण १० वी. घरात सत्यशोधकीय वातावरण त्यामुळे सामाजिक भान असलेली वैचारिक जडणघडण होत गेली.

प्रश्न : समाजासाठी काहीतरी केले पाहिजे  अशी प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली ? आणि तुम्ही पूर्णवेळ समाजकार्य, चळवळ यांना देता  हे कसे शक्य होते?

उत्तर - इयत्ता ४थीत असताना (१९६८).  चीन, पाकिस्तान युध्द्दामुळे देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. वडील नोकरीवर असल्यामुळे  आमच्या घरची परिस्थिति  चांगली होती. पण आजुबाजूला खूप गरीबी होती. शाळेत मुले डब्यात मिलोची, कुकसाची जाडीभरडी भाकरी आणायचीत, काहीतर उपाशीच राहायची. तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. माझा डबा मी वाटून खात होती. घरी आल्यावर या विषयावर मी वडिलांशी चर्चा करायची. तेव्हा वडील युध्दामुळे हे असं होत आहे असं सांगायचे. तेव्हापासून युद्ध नकोच वाटायचे. आणि या गरीब लोकांसाठी आपल्याला काय करता येईल असे विचार मी करायची. खूप करुणा दाटून यायची. अजुनही चळवळीत काम करतांना अश्या अनेक प्रसंगांना समोर जावे लागते की ती करुणा पुन्हा पुन्हा  उंचबळून येते. मला वाटते माझ्या या अश्या संवेदनशील जडणघडणीला माझे वडील यांचे सत्यशोधकीय संस्कार महत्वाचे ठरले. वडील सत्यशोधक चळवळीत असल्यामुळे म. ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची उजळणी व्हायची. त्यांच्या विचारांचा माझ्यावर परिणाम होत होता.

      मी पूर्णवेळ समाजकार्य करते. निःस्वार्थपने मी हे काम करीत असल्यामुळे माझी ओळख नागपूर जिल्ह्यात सगळ्यांना आहे. त्यामुळे मला पूर्णवेळ द्यावाच लागतो. अनेक लोक शेख दीदी म्हणून लांबुन आपल्या समस्या घेवून येतात. मी सत्यासाठी, न्यायासाठी रस्त्यावर उतरते. पण या चळवलीला मी पोटभरायचं साधन कधीच बनविले नाही. मी माझ्या उपजिवीकेसाठी शिवणकाम, पेंटिंग, भरतकाम करते. माझ्या निःस्वार्थ वृत्तिमुळे लोकं माझ्याशी जुळली.  त्यांच्या प्रेमामुळेच मला एवढं काम करता येत आहे.

प्रश्न : नागपूरच्या शेतकरी आणि महिला चळवळीत तुमचं मोठं योगदान आहे. त्याविषयीचे यशस्वी आंदोलन आपण केले आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगा.

उत्तर : नागपूर जिल्ह्यात मागच्या तिसऱ्या पीढिचे दलित, आदिवासी, ओबीसी यांनी जंगलात अतिक्रमण करून शेती केली. त्यांना शासन त्यांच्या वाटणीचे शेतपट्टे देत नव्हते. २००५ ला आम्ही यांची  दलित, आदिवासी, ओबीसी संघटना स्थापन केली. ४५ दिवस आंदोलन करून पाच हजार लोकांपैकी दोन हजार लोकांना जमिनीचे पट्टे मिळवून देण्यात यश मिळविले. अजुनही उर्वरित लोकांकरिता लढा सुरु आहे.

      शेतकऱ्यांच्या समस्या जाणून जाणून घेता घेता महिलांच्या समस्यांवर देखील काम करणे सुरु होते. १९९३ ला उमरेड परिसरात एका १६, १७ व्या वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. तिच्यासाठी पहिल्यांदा रस्त्यावर उतरले. तिला न्याय मिळवून देतांना खूप संघर्ष करावा लागला. शेवटी तिला न्याय मिळाला, तिचे पुनर्वसन देखील केले. यानंतर मात्र अश्या अनेक पीडितांसाठी मी रस्त्यावर उतरले. अजूनही लढतेच आहे.

प्रश्न : तुम्ही केलेली या व्यतिरिक्त महत्वाची आंदोलने , कार्ये कोणती?

उत्तर : १९९३-९४ ला संत गाडगेबाबा अभियांतर्गत ३५६ गावात जाती तोडो, समाज जोडो आंदोलन केलं. त्यानंतर १९९६ पासून चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी संघटनेत काम केलं.  त्यात काम करत असताना २६ हजार कामगार नियमित केले. पुढं २००१ साली भारतीय संविधान जागृती अभियानात सक्रिय राहिले. तेव्हा नागपूर जिल्ह्यात सायकल मार्च काढला. नंतर २५ ऑक्टोम्बर २००२ ला १० हजार मुस्लिम बांधवांचा मेळावा घेतला. आता नियमित कौटुंबिक मोफत समुपदेशन करते. दुर्बल महिलांना मोफत शिवणकाम शिकवते. त्यांना सावकारच्या जाचातून सोडवणं अशी कामे करते. याशिवाय,  अंधश्रद्धा विरोध, झोपड़पट्टी, दारूबंदी, जबरान जोत, शेतकरी, शेतमजूर, महिला संघटनेत काम करते.

प्रश्न : ताई, तुम्ही समाजकारण आणि राजकारण यांच्याकडे कसे पाहता?

उत्तर : आमच्या पीढिचे बहुतेक समाजकारण करणारे कधीच राजकीय क्षेत्राकडे वळलो नाहीत; पण तुमच्या पिढीने हे करु नये. कारण सामाजिक कार्याची जाण असणारी, समाजाची चिंता करणारी, संवैधानिक मूल्य जपणारी मंडळी राजकारणात यायला हवी. परिस्थिति आता भयाण आहे. मुठभर लोकं समाजावर नियत्रंण मिळवीत आहेत. धार्मिकतेचा मुद्दा समोर करून सत्तेचं राजकारण सुरु आहे.

प्रश्न : शेवटचा प्रश्न ताई. तुम्ही महिलांच्या चळवळीत काम करता. परिवर्तनवादी सगळ्या चळवळीशी तुम्ही जुळून आहात, स्त्रीवादी भूमिका आणि या भूमिकेची याबद्दल थोडक्यात तुमचे मत सांगा.

उत्तर : स्त्रीवादी भुमिका म्हणजेच समतावादी भुमिका. इथे फक्त स्त्रीच्यांच नाही सर्वांच्या समतेचा (थर्ड जेंडर सुद्धा) आग्रह आहे. जोपर्यंत लिंगभेद आहे तोपर्यंत स्त्रीवादाची आवश्यकता आहेच. म्हणून मी या भूमिकेचा पुरस्कारच करते.

 खूप महत्वपूर्ण ताई. आणि खूप खूप आभार. आपल्या समोरच्या परिवर्तनवादी कार्याला सदिच्छा.