माधुरी वसंतशोभा यांच्या तीन कविता



सुरक्षिततेच्या नावाखाली माझ्या अस्तित्वाच्या सिमारेषा झाल्याहेत या भिंती.


लिंग, जात, धर्म, देश यात
 बंदिस्त करणाऱ्या या भिंती शतकानुशतके 
मजबूत होत चालल्याहेत.

मी कितीही आकाशात उंच भरारी घेत 
जग पालथं घालण्याच्या गप्पा केल्या तरी 
माझ्या अहंम झाल्याहेत या भिंती.

...पण या भिंतीआड साचलाय, 
साचत चाललाय खोलवर चिखलगाळ शतकानुशतकापासूनचाच.
मी मात्र त्यात उमललेल्या दोन चार कमळांवरच आहे जाम खूष....
स्वतःचे सरोवर फुलले समजून.

मला कळत कसं नाही 
माझ्या अस्तित्वहीन होत गेलेल्या 
भळभळणाऱ्या 
आतील जखमांचा हा प्रदेश.

त्यातील आभासी सरोवर म्हणजे  
पुन्हा जखमांचे किशोर होणे.

जखमा असोत वा जाणिवा त्या उघड्या केल्यात 
की भरून पावतात.

●●●

काळाच्या उत्खनात तुझ्या 'बाई' असण्या पासूनचे मागे 'माणुस' असण्यापर्यंतचे  पुरावे


नर मादीच्याही पल्याड असणाऱ्या  तुझ्या अस्तित्वाच्या खुणा
तपासल्या
की कळेल तुला
आताशा  असणाऱ्या नैतिक अनैतिकतेच्या संकल्पनांचीच घातलीय जन्माला बळजबरीची व्यवस्था
.....शेवटी लागेल हाही शोध 
गाळाच्या शेतीतून 
तू उगवलीस नगरं, कला, संस्कृती, सत्ता
आणि त्या सत्तेच्या हव्यासापायी तुझी 'बाई' करणारा पुरुषही.

●●●

ती म्हणाली,
"मासिक पाळीचाच घेतला असता धर्म जाणून तर...
माणसा माणसात भेद करून विटाळ मानणाऱ्या  प्रत्तेक धर्माला केला असता मी  प्रवेश निषिद्ध गाववेशीवरच
रक्त म्हणजेच सृजन,सृजन म्हणजेच क्रांती
हे तत्वज्ञानही घेता आले असते समजून

मग.....

नवसृजन करणाऱ्या माझ्या मासिक पाळीनच रंगवला असता मी माझा प्रदेश 
आणि...
त्याच मासिक पाळीच्या रक्तानी न्हावु घातलं असतं माणसानी निर्माण केलेल्या ईश्वराला कायमचा विटाळमुक्त करण्यासाठी
...डार्विन चा सिंद्धांत सांगत.

माझ्या पाळीच्या रक्तातील थेंबाथेंबात मला दिसतो फक्त आणि फक्त उत्क्रांत होत गेलेला माणूस."

- माधुरी वसंतशोभा