अंधारलेली खोली, मिणमिणता दिवा, उदासिनतेनं सर्वत्र बैठक मांडलेली, वस्तुवस्तुतून हसणारं दारिद्र्य सोबतीला होतं त्याच्या. तहानभूक विसरून तीन दिवसापासून तो एकटक तिच्या चेहऱ्याकडे डोळे लावून बसलेला होता. दवाखान्यातून दामले साहेबांनी तिला खोलीवर घरी आणलं तेव्हा ते बोलले होते, "शंभू आईकडे लक्ष ठेव." म्हणून तो नजर लावून बसलेला होता. त्या दिवशी ती हलकीशी मान हलवून किलकिल्या डोळ्यांनी त्याच्याकडे क्षीण झालेल्या नजरेने बघत होती. त्यावेळी स्वतःचा हात मोठ्या कष्टाने तोंडाजवळ नेत जेवला काय? काहीतरी खाऊन घे किंवा उपाशी आहेस रे शंभू असाच मुकसंवाद त्याला उमजत होता. त्याच्या जेवणासाठीची तिची धडपड त्याला ठाऊक होती. सकाळी कामावर निघालेली आई जीवाचं रान करत, साडेबारा एक पर्यंत त्याच्या जेवणासाठी न चुकता येणारी, तो शाळेतून आणि ती कामावरून... पायाला भिंगरी लावून चपळतेने वावरणारी. अशी दुबळी गलीतगात्र होऊन पडली पडलेली. त्यानं तिच्या तोंडात पाणी टाकलं तेव्हा तोंडातून काही बुडबुडे बाहेर आले आणि मग घशातून घर्रss घर्रss असा विचित्र आवाज निघू लागला. त्याला काहीच सूचना. तिने डोळ्याला गच्च मिटलेले. चेहरा आक्रसलेला. देहाच्या अंधार गुहेतील भीषण कालवा कालव आणि मनाचं मुकद्वन्द कदाचित चेहऱ्यावर उतरू पाहत होतं. त्याचे डोळे आता पेंगुळलेले... तिच्याकडे बघत छातीवर डोकं टेकवून निद्रेच्या आधीन झाला होता. पहाटे शंभूsss हाकेनं त्याला जाग आली. दाराशी दामले काका आत येत त्यांनी विचारलं, "कशी आहे आई?" ते तिच्याजवळ पोहचलेले. तिचं थंडगार कलेवर, चेहरा करूणेनं भिजलेला. निरागस शंभू तारवटलेल्या पापण्या घेऊन आतापर्यंत तिच्या कुशीत निजलेला... कष्टाने कृश झालेला तिचा देह, हात पाय सुकलेल्या फांदी सारखे शुष्क काळसर.
"शंभू गेली तुझी आई...."
दामले काकांचा कोरडाठन्न स्वर त्याच्या कानावर पडला. शंभू शून्य नजरेने तिला न्याहाळू लागला. चैतन्य कधी उडालं असेल, आपल्याला कसं कळलं नाही. निपचित पडलेला तिचा देह, लोकांची वाढलेली गर्दी, काना कानात सुरू झालेली कुजबूज, झोपडपट्टीच्या बाजूला असलेल्या उंच इमारतीच्या सहनिवासातील अनेक परिवार ज्यांची सेवा तिने केली होती. जनरीत म्हणून अंतिम दर्शनाला आलेली होती.
'जन्मापासून छळणाऱ्या दारिद्र्याचा शिका कायम कपाळावर लिहून गेली अभागी'.
बघ्यामधून आलेली तिच्याबद्दलची एक प्रतिक्रिया चार कानावर आदळली; आणि त्या पाठोपाठ इतरही री ओढणाऱ्या अनेक. "कसलासा दुर्धर आजार, रक्ताचे पाणी करणारा... जाणारच होती ती.. शासकीय रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हात टेकले होते, घेऊन जा म्हणाले घरी तीन दिवसातच सुटली..."
"वडिलांचे छत्र तर नव्हतंच शंभूला आता आईनही पोरकं केलं हो तिच्या लेकराला.."
"तरुण वय, देखणं रूपडं पण कष्टाने पार काळवंडून गेलं, गालाच्या खोबण्या, डोळ्याची बुबुळं... सुटली बिचारी"
"काय वय असेल?"
"असेल बावीस... पंचविसची"
"दामले काकांनीच ऍडमिट केलं होतं... खूप केलं हो त्या माणसानं तिच्यासाठी... आजकाल कोण करतं, म्हणाले आमच्या घरची सारी कामं सेवाभावाने केली, लेकीच्या बाळंतपणात तेल पाणी केलं... अभागी पोर नात्याचा कुठला गोतावळा नाही. चार घरची धुणी भांडी करून पोसत होती लेकराला..."
"कुमारी माता होती म्हणे ती.."
शेवटची प्रतिक्रिया ऐकून गर्दी स्तब्ध झाली. आणि मुक्या नजरा शंभूच्या चेहऱ्याशी बोलू लागल्या. कुणी संशयांनं, कुणी हिणकसपणे खेळू लागल्या.
अंतिम संस्काराची जबाबदारी कर्तव्य भावनेने दामले काकांनी स्वीकारलेली. वास्तवतेची वसनं अंगावर घेतलेली माणुसकीची चार माणसं त्यांच्याभोवती गोळा झाली होती. त्यांच्या सूचनेप्रमाणे कृती घडू लागल्या. कुणीतरी पुढच्या सोपस्काराच असं बोललं तेव्हा आजच अंतविधी सोबत इतर क्रिया कर्माचं सारं आटोपण्याचं काकांनी ठरवलं. आगटं शंभूच्या हातात थोपवून गर्दी नदीच्या घाटावर उतरली. सरत्या सूर्याच्या मंदावलेल्या प्रकाश पसरलेला तोपर्यंत गर्दी बरीच पांगलेली होती. आईच्या देहाची राख लोकांनी नदीच्या पात्रात सोडलेली डोळ्यांनी पाहिली. कुणीतरी त्याला नदीच्या पाण्यात बुडवून आणलं, त्याचे केस नाह्व्याकडून भादरले... शेवटच्या चार माणसांनी पिंडदानाचा भात काकांच्या सांगण्यावरून पत्रावळीवर मांडला. हिरव्या पानावर भाताचे तीन गोळे काकस्पर्शाची प्रतीक्षा करू लागले. बराच वेळ लोटला तरी कावळा फिरकेना... दामले काका आणि शंभू नदीच्या तीरावर झाडाखाली बसून कावळ्याची वाट पाहू लागले. झाडाझाडांवर पक्षांचा किलकिलाट. आकाशातून घारीच्या फेऱ्या खाली उतरलेल्या. किती वेळ थांबायचं आणखी अशा नजरेने दामले काका आणि शंभू शब्दाविना बोलत होते. मन विचलित झालेलं. काळजीत पडलेल्या काकांनी काही ठरवत त्याचा हात हाती धरला.
"शंभू, चल पिंडाजवळ. पिंडासमोर बसून पुटपुटले. "जानकी, शंभू माझ्याजवळ राहील"
शंभू कधी भाताच्या गोळ्या कडे कधी काकांकडे बघत होता.
"शंभू , मला आता निघावं लागेल, तू मात्र थांब थोडा वेळ, मी गेलो की कावळा आता नक्की स्पर्श करेल पिंडाला. तुझी आई होती ती तुला थांबावच लागेल, कावळा शिवला की, तू सरळ फ्लॅटवरचस् निघून ये.. आता तू राहू शकतोस आमच्या सोबत". एवढं बोलून दामले काका झपाझप पावलं टाकून निघून गेले.
नदीचं पात्र आता संथपणे चमक धरु पाहत होतं. आकाशात एकलपक्षी दिसू लागलेला. झाडांनी सावली सोडलेली. त्यांची साक्ष स्थितप्रज्ञ तपस्वी ऋषिमुनींची भासावी अशी. आजूबाजूला एकही चिटपाखरू नाही. काळोख गडद होईल आणि या निर्जन स्थळी मी इथे एकटा... त्याचं मन भीतीने थरथरलं. पोटात भुकेचा डोंब उसळलेला; आणि त्याची नजर त्या भाताच्या गोळ्यावर स्थिरावली. भूक मी म्हणत होती. गेल्या तीन दिवसात पोटात अन्नाचा कण नव्हता .आईss त्याचं मन गहिवरलं. आता घरी तरी मला कोण जेवायला देणार? त्याला रडू कोसळलं, एकलेपणाची जाणीव जागी झाली. त्यानं आजूबाजूला पाहिलं. या गोळ्यातला एक गोळा खाल्ला तर कोण कोणाला पाहणार? कोण कोणाला सांगणार? इथे आता कुणीच नाही, आणि एक गोळा हाती धरून त्याने तो अधाशा सारखा तोंडात कोंबला. द्रोणातल्या पाण्याचा घोट घेऊन तो घास गिळला. क्षणात पोटातला दाह शांत झाला. तो कावळे बसलेल्या झाडाकडे वळला आणि काय आश्चर्य.. पिंडाभोवती कावळे तुटून पडलेले ते जणू वाटच पाहत होते, अटच अशी असावी जोपर्यंत शंभूची भूक क्षमणार नाही कावळा पिंडाला शिवणार नाही. शंभू त्यादृश्यानं सुखावला. आई माझ्या पोटात अन्न जाण्याची वाट पाहत होती तर.... पण पुढे काय? आईss तू माझी आई, शंभूची आई होय, थांबावच लागणार होतं मला.... पण आई, मनात प्रश्न आणि मेंदू प्रतिक्रियांची उजळणी करत तो परतीच्या वाटेवर निघाला. पायात त्राण उरले नव्हते. एका वळणावर थबकले त्याचे पाय... दामले काकांची पाठमोरी आकृती त्याच्या डोळ्यापुढं आणि ते वाक्य घोंगावणाऱ्या भोवंड्यासारखं फिरू लागलं. "तुझी आई होती ती, तुला थांबावच लागेल, आता तू राहू शकतोस आमच्या सोबत तू सरळ फ्लॅटवरच निघून ये..."
या वाक्यासोबत आणखी एक वाक्य त्याच्या कानात तप्त तेल ओतल्यागत थेट काळजाला बोचू लागलं. प्रतिक्रियेतलं कोणीतरी बोलून गेलो होतं.
"बाप म्हणून शंभूचं तेवढं करावंच लागेल... दामलेंना."
त्या वळणावर शंभू थबकला. उंच इमारतीच्या शानदार प्रशस्त सहनि निवासाच्या विरुद्ध दिशेने वळणाऱ्या रस्त्याने तो आपल्या झोपडीकडे वळला. खोलीवर आईची माया वावरत होती. वळकटया, उतरंडी, लोखंडी पेटी. त्याची भिरभिरती नजर शाळेच्या दप्तरावर स्थिरावली. धावत जाऊन त्यानं ती छातीशी कवटाळली.
"आई..ss मी इथेच राहीन तुझ्यासोबत..."
आई संपूनही त्याच्याजवळ उरली होती. पितृत्वाची दुखरी सल पोटाशी ओढून तो दप्तराच्या कुशीत शिरला होता.
- डॉ. मंजूषा सुनील सावरकर
(कुसुमकन्या)
'शिव,' २८५, श्री महालक्ष्मी नगर,
न्यू नरसाळा रोड, पंचमुखी हनुमान मंदिर जवळ, नागपूर -३४
.jpg)